(दापोली / प्रतिनिधी)
दापोलीत एक विचित्र घटना घडली आहे. लग्न मोडल म्हणून रागाच्या भरात मुलीच्या नातेवाईकांच्या घराला आग लावल्याचे बोलले जात आहे. ठरलेले लग्न मोडल्याच्या रागातून उपवर मुलाने मुलीच्या नातेवाईकांच्या घराला आग लावून दिल्याची घटना तालुक्यातील कोळथरे मोहल्ला येथे मंगळवारी घडली.
याबाबत गावातील नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीवरून दापोलीतील एका मुलाचे कोळथरे येथील एका नातेवाईक मुलीबरोबर लग्न ठरले होते. शिवाय साखरपुडाही झाला होता. मात्र मुलीच्या नातेवाईकांकडून हा साखरपुडा मोडण्यात आला. दोन दिवसापूर्वी कोळथरे गावात उर्स कार्यक्रम होता. या कार्यक्रमालाही हा युवक दापोलीतून गेला होता. मात्र तेथे जाऊन त्याने मुलीच्या घरच्यांशी लग्न मोडल्याच्या कारणावरून भांडण केले.
यानंतर घरातील नातेवाईकांनी मुंबई येथील नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली. मात्र आता खूप रात्र झाल्याने उद्या काय ते पाहू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळीदेखील या युवकाने त्यांच्याशी भांडण केले व लग्न मोडल्याच्या रागातून तुमच्या घराला आग लावून देईन, अशी धमकीही दिली. या युवकाने मुलीच्या नातेवाईकांच्या घराला चक्क आग लावून दिल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे.
आग लागल्याचे कळताच घरातील सर्व व्यक्ती घराच्या बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. या आगीने घराचे छप्पर जळून खाक झाले व सर्वच्या सर्व छप्पर खाली आल्याने पूर्ण घराचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दाभोळ दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून ते आग लावण्याच्या कारणांचा तपास करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.