(मुंबई)
सर्वसामान्यांची हक्काची असलेली लालपरी प्रत्येकाच्या मनात सुखाचा आणि आनंदाचा प्रवास घेऊन येत असते. गाव तेथे एसटी असं ब्रीदवाक्य कायम ठेवताना आर्थिक अडचणींना सामोरं जात एसटीच्या तोट्यात यावर्षी घट झाली आहे. मागील वर्षभरापासून 4000 कोटी रुपये तोट्यात असलेली एसटी आता थेट 10 कोटींवर आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचारी हे संपावर होते. त्यावेळी एसटी महामंडळाला तब्बल 4000 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच गाड्या चालवण्यासाठी डिझेलसाठीही पैसा देखील उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार हे अर्थमंत्री असताना महिना 300 कोटी रुपये देण्याची सरकारने कबुली दिली होती. परंतु ती रक्कम वेळेत न मिळाल्यामुळे दिवसागणिक तोटा वाढत चालला होता. त्यावेळी राज्य सरकारच्या मदतीची खरी गरज होती. कारण एसटीने प्रवास करण्यापेक्षा खासगी वाहनांकडे प्रवाशांचा ओढा होता.
यावेळी महामंडळाचा तोटा वाढत होता. परंतु नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आणि एसटी महामंडळाला फायदा झाल्याचे दिसून आले. एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के आणि 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना 100 टक्के प्रवासात तिकीटात सवलत दिली. तर महिलांना थेट 50 टक्के एसटी भाड्यात सवलत दिली. त्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. तसेच या निर्णयानंतर महामंडळाला फायदा होत असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी म्हटले.
एसटी महामंडळाचे राज्यातील 31 विभागांपैकी 18 विभाग सध्या फायद्यात आहेत. यामध्ये बीड पहिल्या क्रमांकावर असून परभणी दुसऱ्या आणि जळगाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता महागाई भत्ता मिळणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी 14 जून रोजी महत्वाची घोषणा केली. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच 10 वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात येणार आहे. या योजनेला धर्मवीर आनंद दिघे नाव देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.