(रत्नागिरी/प्रतिनिधी)
गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एस.टी. कर्मचार्यांचा संपाचा तिढा काल गुरुवारी सुटला. कर्मचार्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हावे, तोपर्यंत महामंडळाने कर्मचार्यांवर कोणतीही कारवाई करु नये तसेच कर्मचार्यांना पीएफ, पेन्शन, आणि ग्रॅच्युईटी देण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिली.
कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत रत्नागिरी विभागीय कार्यालयाबाहेर बसलेल्या एसटी कर्मचार्यांनी जल्लोष साजरा केला. ढोल-ताशे वाजवत फटाक्यांच्या माळा लावून आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते. अखेर संपाचा तिढा सुटल्याने रत्नागिरी विभागातील अडीच हजार कर्मचारी कामावर हजर होणार आहेत. संपामुळे हाल सोसणार्या ग्रामीण जनतेला मात्र दिलासा मिळाला आहे.
मात्र असे असले तरी ज्या मागणीसाठी म्हणजेच विलीनीकरण व्हावे यासाठी जो संघर्ष करण्यात आला होता ते तर झालेच नाही, मात्र शासनाने दिलेल्या सुविधांवर समाधान मानावे लागले. असंच होतं तर विलीनीकरणाचा मुद्दा घेऊन 5 महिने आंदोलन का पुकारलं होतं, यामध्ये त्रास झाला तो सर्वसामान्यांनांच ना? असेही सर्वसामान्यांमधून बोलले जात आहे.