(रत्नागिरी / प्रतिनिधी)
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या शासनाने मान्य केल्याने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे दि. १३ सप्टेंबरपासून रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात येणारे बेमुदत उपोषण रद्द करण्यात आले आहे. मात्र गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन चिघळली असते तर वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता होती.
बेमुदत उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सह्याद्री अतिथीगृहावर आंदोलन करणाऱ्या संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्यासमवेत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा करण्यात आली. काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती. रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचा भत्ता ३८ टक्केवरून ४२ टक्के वाढ करण्यासाठी परवानगी दिल्याने महागाई भत्ता देण्याचा मार्ग त्यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे मोकळा झाला. सण, उत्सव अग्रीमाची रक्कम १० हजार वरून १२,५०० रुपये करण्यास मान्यता देण्यात आली. मागील महागाई भत्त्याच्या थकबाकी तसेच घरभाडे भत्ता व वेतनवाढीतील फरकाबाबत येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री यांच्यासमवेत संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येणार आहे.
अप्पर सचिव (वित्त), प्रधान सचिव (परिवहन) व उपाध्यक्ष व ३४ व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची समिती नियुक्त करून समितीने शासनाला ६० दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर अन्य प्रलंबित मागण्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. त्याबाबत संबंधिताना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.