(मुंबई)
एसटी संपकरी कामगारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सध्या वकील गुणरत्न सदावर्ते हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. यावर नुकतीच न्यायालयात सुनावणी झाली आहे. अजूनही ठिकठिकाणी त्यांच्यावर नवनवीन गुन्हे दाखल होत आहेत, त्यामध्ये कामगारांकडून २ कोटींहून अधिक रकम वसूल करण्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. आता त्या पैशातून सदावर्ते यांनी कोणकोणती मालमत्ता खरेदी केली याचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबतची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात दिली, त्यामुळे सदावर्ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
मुंबई पोलिसांच्या कोठडीत चार दिवस काढल्यानंतर सदावर्ते यांना सातारा पोलिसांच्या कोठडीत जावे लागले, तिथे चार दिवस काढल्यानंतर यांचा अकोट पोलीस ताबा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. अकोट येथे सदावर्ते यांच्याविरोधात एसटी कामगारांना फसवून पैसे जमावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यातच सदावर्ते यांच्या घरात पैसे मोजण्याची मशीन सापडली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. पैसे मोजायला मशीन लागते तर एवढे रोखीने पैसे सदावर्ते यांच्याकडे आले कुठ्न हा शोध आता पोलिस घेत आहेत. यामुळे अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर न्यायालयात आपली बाजू मांडताना सरकारी वकील घरत यांनी सदावर्ते पोलीस चौकशीत सहकार्य करत नाही, ते स्वतःचा मोबाईल द्यायला तयार नाहीत, असेही म्हटले आहे.