(मुंबई)
पगार वाढ, नियमित पगार आणि इतर कारणांसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचा-यांच्या पदरी पगाराच्या ऐवजी अद्याप प्रतीक्षाच असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांना १० तारीख उलटली तरी वेतन मिळाले नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी हतबल झाले असल्याचे दिसून येत आहे.
सरकारने फक्त १६५ कोटी रुपयांचा सवलत मूल्य रकमेच्या परताव्याचा निधी देणे, सदर निधी एसटीच्या खात्यावर जमा न होणे ही शुद्ध फसवणूक असून याला राज्य सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचा-यांनी केला आहे. राज्य सरकार हे संप काळात दिलेल्या आश्वासनाकडे डोळेझाक करीत असून त्यामुळे कर्मचा-यांना वेळेवर वेतन मिळत नाही. हे आता नित्याचेच झाले असून ही कर्मचा-यांची थट्टा सुरू आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला.
काही दिवसांपूर्वी शासनाच्या परिपत्रकात जाहीर केलेली १६५ कोटी रुपये ही रक्कम वेतनासाठी अपुरी असून ही रक्कम एसटीच्या खात्यावर अद्याप वर्ग झालेली नाही. यामुळे कर्मचा-यांना या महिन्यात वेतन वेळेवर मिळालेले नसून, निधी देण्याच्या बनवाबनवीमुळे यापुढे महामंडळ आर्थिक सक्षम होणार नाही. या पुढे कुठलीही विकासकामे होणार नाहीत. कदाचित डिझेलअभावी गाड्या उभ्या राहतील, अशीच परिस्थिती असल्याचे एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.
एसटी महामंडळाला वेतनासाठी दर महिन्याला ३६० कोटी रुपये इतक्या निधीची गरज आहे. मात्र, १६५ कोटी इतकी कमी रक्कम महामंडळाला देणे आणि ती सुध्दा सवलत मूल्य रक्कमेतून देणे ही शुद्ध फसवणूक असे त्यांचे म्हणणे आहे.