(मुंबई)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्माचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. यामुळे राज्य शासनावर एकंदर ९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळावा, अशी मागणी करत होते. यानंतर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली. सध्या एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ३८ टक्के मिळणार आहे.
महागाई भत्त्यात वाढ करण्यात यावी, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आणि महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती उत्सवाच्या तोंडावर पुन्हा महागाई भत्त्यात वाढ मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण झाले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून वाढवून ३८ टक्के करण्यास आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी – कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. pic.twitter.com/fsRx40JU0S
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 8, 2023