(मुंबई)
एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाचा मार्ग आता मोकळा होणार आहे. राज्य सरकार सवलत मूल्याचे २२० कोटी यासोबतच अतिरिक्त १०० कोटी रुपये दरमहा एसटी महामंडळाच्या खात्यात जमा करणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. पगाराची तारीख उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने संतापाचे वातावरण होते. एसटी महामंडळाकडून अर्थ विभागाला या संदर्भात पत्र लिहिण्यात आले होते. यानंतर अर्थ, परिवहन आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दर महिन्याला ७ ते १० तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारने कोर्टामध्ये दिले होते. परंतु दर महिन्याला पगाराला उशीर होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महामंडळावर काही संघटनांच्यावतीने याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या.