(मुंबई)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांवरील नागरिकांना सर्वसामान्यांची लाल परी असलेल्या एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. महाराष्ट्रात लागू केलेल्या एसटी मोफत प्रवासाचा लाभ एका महिनाभरात तब्बल 55 लाख नागरिकांनी म्हणजे दररोज सरासरी १ लाख ७५ हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे.
२६ ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली. या मोफत प्रवासात आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.
एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृतज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे. २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबरपर्यंत राज्यभरातून ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांना सर्व सेवांमधून ५० % सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. .