(मुंबई)
एसटीच्या संपकाळात आणि कोरोना कालावधीत राज्यभरात पर्यायी म्हणून नियुक्त केलेल्या ८०० कंत्राटी एसटी चालकांना आता कार्यमुक्त करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वसुचना न देता अचानक त्यांना कामावरुन कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर २०२१ पासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा बडगा उगारला होता. अनेक वाटाघाटी करुनही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने हा संप दीर्घकालीन चालला. या संपामुळे एसटीचे आर्थिक उत्पन्न पूर्णपणे बंद झाले. शिवाय खासगी वाहतूकदारांकडूनही भाडे वाढवून प्रवाशांची अतोनात लूट सुरू होती. या काळात एसटीला वाचविण्यासाठी तसेच प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीमार्फत कंत्राटी चालकांची नियुक्ती केली होती.
राज्यभरात सुमारे ८०० कंत्राटी चालकांना नियुक्त करुन एसटीचा गाडा सुरू झाला. या चालकांना सुमारे ३१ हजार रुपये वेतन देण्याचे ठरले होते. परंतु, चालकांच्या हाती मात्र १५ ते १६ हजार रुपयेच पडत असल्याचे सांगितले जाते. कंत्राटी चालकांच्या मदतीने हळूहळू एसटी महामंडळाची स्थिती काही प्रमाणात रुळावर येत गेली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतल्यानंतर त्यांना कामावर परत घेण्यात आले. तरीसुद्धा कंत्राटी चालकांची सेवा सुरूच होती. दरम्यान, सन २०१९ च्या भरतीतील चालकांनाही महामंडळात नियुक्ती देण्यात आली. तेव्हापासून मात्र कंत्राटी चालकांना भवितव्याची चिंता सतावू लागली. अखेरीस ३ सप्टेंबर २०२२ पासून या ईमाने इतबारे सेवा करण्याऱ्या या कंत्राटी चालकांची सेवा समाप्त करुन त्यांना टप्प्याटप्प्याने कामावरुन कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रकारामुळे त्यांचेवर मात्र नोकरीसाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.