(खेड / भरत निकम)
स्पर्धेच्या युगात आधुनिक जगात एसटी महामंडळाने आणलेल्या नव्या ॲन्ड्राॅईड मशीनव्दारे आता ‘गुगल-पे’ आणि ‘पेटीएम’ने प्रवासाचे तिकीट मिळणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत याची सुरुवात केली जाणार आहे.
कोरोना काळासह कर्मचारी आंदोलन झाल्यानंतर एसटी महामंडळ पुन्हा उभारी घेईल की नाही, अशी शंका राज्यभरातील सर्व सामान्य नागरिकांना वाटून होती. ‘सुट्टे पैसे द्या’, अशी आरोळी ऐकल्यावर वाहक आला, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची सवय प्रवाशांना लागलेली आहे. प्रवासाला निघताना तिकीटाची रक्कम सुट्ट्या स्वरुपात जमवून ठेवली जात आहे. आजही एसटीतून जाताना कमी-जास्त रक्कम दिली गेली म्हणून वाहक आणि प्रवाशी यांच्यातील वाद पहावयास मिळत आहेत.
संगणकीय युगात पाण्याच्या बाटल्यांपासून ते मोठमोठ्या वस्तूंची खरेदी बारकोडने होते. बाजारातील दुकानासमोर हे बारकोड लावलेले दिसून येतात. सगळ्या प्रक्रियेत अनेक तरुण तरुणी खिशात रोख स्वरूपात पैसे ठेवत नाहीत. त्याचबरोबर खिशात भरगच्च पाकीट ठेवण्याची पध्दत होती. जेवढं पाकीट जाड तेवढाच पैसा जास्त असा गोड समज तरुणाईचा होता. त्यानंतर ‘गुगल-पे’ आणि ‘पेटीएम’ने पाकीटाची जागा घेतली होती. मात्र, एसटीची तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम आजपर्यंत जवळ बाळगावी लागत असे.
एसटी महामंडळाने आधुनिकीकरणाच्या युगात पुढचे पाऊल टाकले असून रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ३१३ ॲन्ड्राॅईड तिकीट मशीन आणलेल्या आहेत. पुढील ८ ते १० दिवसांत या मशीन कार्यान्वित केल्या जाणार आहेत. त्याचे प्रशिक्षण हे वाहकांना दिले जात असून नव्या मशीनवर तिकीट काढताना मशीनमध्ये असणारा बारकोड स्कॅन केल्यावर भाड्याचे पैसे वाहकाकडे जाणार आहेत. त्यानंतर तात्काळ प्रवासाचे तिकीट हाती पडणार आहे. एसटीच्या जिल्हा प्रशासनाने २ हजार ३१३ मशीन घेऊन नऊ तालुक्यात त्याचे वाटप केले आहे. परिपूर्ण प्रशिक्षण घेतल्यानंतर वाहक गावोगावी जाणाऱ्या एसटीमध्ये हे आधुनिक तंत्रज्ञान असणारे मशीन वापरणार आहेत. त्यातून आता यापुढील काळात वाहक आणि प्रवाशांची सुट्ट्या पैशांवरुन होणारी हाणामारी आता होणार नाही. ‘गुगल-पे’ आणि ‘पेटीएम’ने थेट प्रवासाचे तिकीटाची रक्कम वाहकास मिळणार आहे. प्रवाशांसाठी व वाहकासाठी ही चांगली सोय झाली, त्याशिवाय सुट्टे पैसे ठेवण्याची गरज कुणालाही यापुढे भासणार नाही.