रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठराविक आरोग्य केंद्रावर एकावेळी एमआयडीसीमधील सर्व कामगार, कर्मचार्यांना लस मिळणे शक्य नाही. प्रत्येकवेळी कंपनीतून रजा घेऊन लसीसाठी केंद्रावर रांगेत उभे राहूनही लस मिळालेली नाही. त्यामुळे एमआयडीसीमध्ये या कामगारांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी भाजपा कामगार आघाडीने केली आहे. यासंदर्भात आघाडीचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष लीलाधर भडकमकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
यात म्हटले आहे, केंद्र सरकारने दिलेल्या 6 एप्रिल 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार 45 व त्याहून अधिक वय वर्षे असणार्या कामगार, कर्मचार्यांचे लसीकरण कामाच्या ठिकाणी जाऊन करण्याचे नमूद केले आहे. परंतु तसे शक्य नसल्यास कामगार, कर्मचारी यांना एमआयडीसीमध्ये केंद्र उभारल्यास तिथे जाऊन लस घेणे शक्य होईल.
रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसीमध्ये जे. के. फाईल्स, गद्रे मरीन, वेरॉन, जीएफ आणि इतर भागात फिनोलेक्स, जिंदाल अशा अनेक कंपन्या आहेत. सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये कामगार जीव मुठीत घेऊन कामावर जात आहेत. हाच कामगार प्रत्येक कुटूंबातला कुटूंबप्रमुख असतो. या कठीण परिस्थितीत त्यांना वेळीच लस मिळाली नाही तर, कोरोना संसर्ग वाढू शकतो.
त्यामुळे एमआयडीसीमध्ये सर्व कंपन्यांमधील कामगार, कर्मचार्यांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभे केल्यास सर्व कामगार त्या केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतील. तसेच यामुळे इतर केंद्रावर गर्दी होणार नाही. कामगारांना सुद्धा वेळेत लस घेता येईल. याबाबत जिल्हाधिर्यांनाही पत्र पाठवले होते. त्यामुळे याचा पाठपुरावा करत श्री. फडणवीस यांनी जिल्हाधिकार्यांना स्वतंत्र केंद्र उभारण्याची सूचना करावी, अशी मागणी श्री. भडकमकर यांनी केली आहे. यावेळी भाजपा कामगार आघाडीचे सरचिटणीस संतोष बोरकर, तालुकाध्यक्ष प्राचीन नागवेकर, उपाध्यक्ष अमर किर तसेच भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, डॉ. विनय नातू आदी उपस्थित होते.