(नवी दिल्ली)
राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड अर्थात् एनसीईएलला आतापर्यंत 7000 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. निर्यातीतून मिळणारा 50 टक्के नफा शेतकर्यांना आणि सहकारी संस्थांना दिला जाईल, असे प्रतिपादन गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सोमवारी केले. नैसर्गिक शेतीच्या प्रोत्साहनाचा दाखला देताना अमित शाह यांनी सांगितले की, आतापर्यंत 12 लाख शेतकरी नैसर्गिक शेती करीत आहेत. 2027 पर्यंत शेतकर्यांची ही संख्या दोन कोटी पर्यंत पोहोचेल.
सहकारी क्षेत्राकडून होणार्या निर्यातीबाबत राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडद्वारे झालेल्या राष्ट्रीय परिषदेला अमित शाह संबोधित होते. एनसीईएलच्या स्थापनेमागे सहकारी क्षेत्राची निर्यात वाढविणे आणि शेतकर्यांची समृद्धी वाढविणे हे उद्दिष्ट आहे, असे अमित शाह म्हणाले. याप्रसंगी एनसीईएलचा लोगो, संकेतस्थळ आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले तसेच सदस्यता प्रमाणपत्रांचेही वितरण झाले. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेची स्थापना निर्यात वाढविणे, शेतकर्यांना समृद्ध बनविणे, पीकपद्धतीत बदल घडविणे, सेंद्रिय उत्पादनांसाठी वैश्विक बाजारपेठ उपलब्ध करणे, जैवइंधनाच्या बाजारपेठेत भारताचा प्रवेश करणे तसेच सहकार क्षेत्राला बळकट करणे यासाठी झाली आहे. (Amit Shah) राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडद्वारे सर्व सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणीकरण, विपणन आणि पॅकेजिंग करून आंतरराष्ट्रीय बाजारात माल पाठविण्याचे काम होईल. यातून शेतकर्यांना मिळणारा नफा वाढेल आणि भारतीयांसह जगभरातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्याला मदत होईल. नैसर्गिक शेतीसाठी आतापर्यंत 12 लाख शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. 2027 पर्यंत दोन कोटी शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एनसीईएलमुळे निर्यातीला चालना मिळेल तसेच ग्रामीण भागाच्या विकासालाही हातभार लागेल. अर्थात, सहकारी संस्थांनी निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करणार्या दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली.