(राजापूर /प्रतिनिधी)
अखेर पडद्यामागून सुत्रे हलवणाऱ्या एनजीओंविरोधात स्थानिक ग्रामस्थ एकवटले आहेत. बारसूतील विनायक कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर गोवळमधील गौरव महेश परांजपे यांनी देखील सोमवारी राजापूर पोलीस स्थानकात सत्यजित चव्हाण (सध्या रा.गोवळ) तसेच नितीन जठार (रा.नाणार) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केलेल्या आपल्या मालकीच्या गोवळ येथील जागेत सर्वेक्षण सुरू असताना बेकायदेशीरपणे आपल्या जागेत प्रवेश करून सत्यजित चव्हाण (सध्या रा.खालचे गोवळ, कायमस्वरूपी वास्तव्य मुंबई) व नितीन जठार (रा.नाणार) यांनी आपणाला व सर्वेक्षणाचे काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून हातात काठ्या घेऊन अंगावर येत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार गोवळमधील शेतकरी गौरव परांजपे यांनी राजापूर पोलिसांत दिली आहे. या दोघांकडून आपल्या व आपल्या कुटुंबबयांच्या जीवितास धोका असून आपली मालमत्ताही नष्ट करण्याचा प्रयत्न यांच्याकडून होऊ शकतो असे नमूद करत दोघांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परांजपे यांनी तक्रारीत केली आहे.
गोवळ खालचीवाडी, बारसू, सोलगांव या परिसरातील जागा राज्य शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्र म्हणून संपादित केलेली आहे. गोवळ येथे आपल्या मालकीच्या सर्व्हे क्र.२/१, ३/१२, २/३ व ४/१ या ठिकाणी जागेची स्थळ पाहणी करण्यासाठी शासनाकडून काही अधिकारी सहा जून रोजी सकाळ दहा वाजता या जागेवर आले होते. याबाबत अधिकाऱ्यांनी मला कळविले होते व त्यांच्यासोबत मी देखील तेथे हजर होतो.
आपल्या उपस्थितीत या ठिकाणी जागेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. यावेळी सत्यजित चव्हाण व नितीन जठार हे दोघे त्याठिकाणी आले व त्यांनी मला व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरू केली. तुम्ही इथून जा नाहीतर तुम्हाला ठार मारून टाकू, अशी धमकी देत लाठ्याकाठ्या घेऊन माझ्या व उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ते धावून आले. यावेळी जागेच्या स्थळ पाहणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आणलेले काही साहित्यही त्यांनी पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या दोन अधिकाऱ्यांना गोवळ खालचीवाडी येथे एका खोलीत डांबून ठेवले. यानंतर माझ्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना मोबाईलवरून फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी राजापूर पोलीस स्थानकात दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी खोलीत बंद करून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका केली.
यावेळी कंपनीचे कर्मचारी विष्णू शर्मा, शिबू तुला व विनोद कुमार असे तिघेजण प्रत्यक्ष घटना घडली त्यावेळी हजर होते, असे परांजपे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यांचे जबाबही नोंदवण्यात आल्याचे परांजपे यांनी सांगितले.
सत्यजित चव्हाण व नितीन जठार हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्यापासून माझे व माझ्या कुटुंबाला धोका आहे. तसेच माझी मौजे गोवळ येथे स्थावर व जंगम मालमत्ता आहे. ती देखील ते नष्ट करतील, अशी मला भीती वाटत आहे. तरी घडलेल्या प्रकाराबाबत या दोघांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परांजपे यांनी या तक्रार अर्जात केली आहे.