(पुणे)
खडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाने आरडाओरड केल्याने त्याचा खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. लक्ष्मण बाबूलाल देवासी (वय ८, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी बापिल अहमद रईस लष्कर (वय -२६, रा. चिखली, पुणे, मु रा. सिलचार, आसाम) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लक्ष्मण रविवारी (१७ एप्रिल) दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातून बाहेर गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने कुटूंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो न सापडल्याने लक्ष्मणचे अपहरण केल्याची शंका व्यक्त करत कुटूंबियांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शोध घेत असताना सायंकाळी सातच्या सुमारास लक्ष्मणचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या एका पडक्या पत्राशेडमध्ये आढळून आला. सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. अपहरण केल्यानंतर मुलगा एका खड्ड्यात पडला आणि त्याच्या डोक्याला इजा झाल्याने तो रडून आरडाओरड करू लागला, त्यामुळे आरोपी घाबरला आणि याची कुठे वाच्याता होऊ नये म्हणून मुलाचा डोक्यात दगड मारुन खून केला, अशी कबुली आरोपीने दिली आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दरम्यान, मुलाच्या खुनाचा प्रकार उघडकीस येऊन ४८ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागत नसल्याने नातेवाईकांनी मंगळवारीही चिखली पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. सायंकाळी खुनाचा छडा लागल्यानंतर नातेवाईकांनी अखेर दोन दिवसांनी मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले की, आरोपी बापील अहमद लष्कर हा एका कंपनीत सीएनजी ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि त्याची नोकरी गेली होती. मयत मुलाचे वडील यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्याकडून एक लाखाची खंडणी घेण्यासाठी आरोपीने लक्ष्मण देवासी या आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण केले.