(नवी दिल्ली)
भारतात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला उपयोगी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार एकीकृत परिवहन योजनेवर काम करत आहे. रस्ते, रेल्वे, हवाई व्यवस्थेचा वापर जास्तीत जास्त तर्कसंगतपणे व्हावा, असा त्यामागील उद्देश आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यानंतर परिवहनाच्या कोणत्याही एका व्यवस्थेवर अधिकचा भार पडणार नाही. आसन व्यवस्था, बर्थ इत्यादीबाबतची गैरसोय कमी होऊ शकेल. सूत्रानुसार परिवहन क्षेत्रातील तज्ज्ञांची टीम ‘एक भारत, एकीकृत परिवहन योजने’वर काम करत आहे.
त्याअंतर्गत एकीकृत परिवहन अॅप विकसित केले जाणार आहे. हे अॅप प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. अॅपच्या साह्याने प्रवाशांना परिवहन व्यवस्थेबद्दलचा चांगला पर्याय सहजपणे उपलब्ध होईल. याबाबत रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, देशात आता बहुतांश ठिकाण बस, विमान, रेल्वेचा पर्याय आहे. २००-४०० किमी प्रवासासाठी बसचा पर्याय उत्तम ठरतो. ४००-६०० किमीसाठी कार, ५००-१००० किमीसाठी रेल्वे तर १ हजाराहून जास्त किमी प्रवास करण्यासाठी हवाई प्रवास चांगला पर्याय ठरतो.
अॅप कसे वापरावे?
उदाहरणार्थ तुम्हाला दिल्ली ते मुंबई असा प्रवास करायचा आहे. त्यासाठी पमध्ये आधी प्रवाशांचा तपशील टाकावा. डेस्टिनेशन व प्रवासाची तारीख निवडावी लागेल. ही माहिती नोंदवण्यात आल्यानंतर प बस, ट्रेन किंवा विमान यापैकी उपयोगी असा पर्याय सुचवेल. सुचवलेल्या पर्यायाची तुम्ही निवड केल्यानंतर तिकीट बुक करण्यासाठी अॅप अॅग्रिगेटरच्या संकेतस्थळावर घेऊन जाईल. अॅपद्वारे प्रवाशांना उत्कृष्ट प्रवासी वाहतुकीचा पर्याय मिळू शकेल. थेट बस, रेल्वे किंवा विमानसेवा नसल्याची माहितीही देईल. त्याशिवाय जवळील ठिकाणाचा पर्यायदेखील सांगेल.
कर्नाटकात ४ ठिकाणी वॉटर एअरपोर्ट
देशातील पहिले वॉटर एअरपोर्ट कर्नाटकात तयार होणार आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे, असे सूत्रांनी सांगितले. पाण्यावर धावपट्टी तयार करण्यासाठी आराखडा महत्त्वाचा ठरणार आहे. हा आराखडा परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय तयार करेल. पाण्याच्या किनारी असलेला ढाचा राज्य सरकार विकसित करणार आहे. हे वॉटर एअरपोर्ट कर्नाटकच्या वांयडूर व मालपे (उडुपी), कारवारच्या काली नदी व मंगळुरूत तयार केले जाणार आहेत.