(रत्नागिरी)
समृद्ध महामार्गावरची घटना भयानक होती, एकीकडे प्रेतं जळत होती आणि दुसरीकडे राजभवनात जयघोष चालू होता. ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना आहे. राज्याच्या इतिहासातला हा काळा दिवस असून, यांना पाप करायचं होतं तर दोन चार दिवस मागे पुढे करायला हवं होतं अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावर केली आहे. ते रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना बोलत होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपचे कृत्य सर्वाना कळलेले आहे. भाजपने 2 भाग पाडलेले आहेत. भय आणि भ्रष्टाचार त्या माध्यमातून घाणेरडे कृत्य ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून केले जात आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जे पाप घडले आहे. त्याचे परिणाम भाजपला येणाऱ्या काळात भोगावे लागतील. महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.दरम्यान जे कोणी काँग्रेसबरोबर उभे असतील त्यांना सोबत घेऊन चालू, ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमध्ये या भटजी लोकांनी त्या पद्धतीचे कार्य केलेले आहे. हे आता सर्वांना कळत आहे. भटजींचे राजकारण काय असते हे जनतेला कळलेले आहे, अशी देखील टीका नाना पटोले यांनी भाजपवर यावेळी केली. तसेच देशातील सरकारने संविधांनिक व्यवस्थेचे तीन तेरा वाजवलेले आहेत असेही ते यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडी ही कायम राहील. विरोधी पक्षनेते संदर्भात बसून निर्णय होईल, आत्तापासून आततायीपणा राष्ट्रवादीने करू नये असा सल्ला देखील नाना पाटोले यांनी यावेळी दिला. तसेच 48 लोकसभा आणि 288 विधानसभा यांची चाचणी काँग्रेस करत आहे. महाराष्ट्रातील मूळ पक्ष काँग्रेसच, ही चाचणी आम्ही लपून नाही तर जाहीरपणे करतो आहोत. तसेच मित्रपक्षाला सुद्धा ताकद देण्याचे काम आम्ही करू असं नाना पटोले यावेळी म्हणाले. दरम्यान काँग्रेस पक्षात कुठली भीती नाही, त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. आमच्या पक्षात फूट पडेल असं मला वाटत नाही असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.
स्थानिक जनतेला विश्वासात घेवुन शासनाने रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करावी
रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असेल तर त्याला आमचा पुर्ण विरोध राहिल. येथील स्थानिक जनतेला विश्वासात घेवुन शासनाने या प्रकल्पाची उभारणी करावी अशी स्पष्ट भुमिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारसू प्रकल्प परीसराला भेट दिल्यानंतर मांडली. त्यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यापुर्वीही एकदा मविआ सरकारच्या कार्यकाळात नाना पटोले यांनी प्रकल्प परीसराचा दौरा करुन जनतेशी चर्चा केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा नाना पटोले यांनी रिफायनरी प्रकल्प परीसराचा दौरा करुन सोलगाव येथे मांडवकर यांच्या घरी जनतेची भेट घेतली आणि जमलेल्या प्रकल्प विरोधकांशी चर्चा केली. तसेच आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडू असे अश्वासन दिले. निसर्गाचे नुकसान असेल तिथे प्रकल्पाचे समर्थन काँग्रेस करणार नाही. कोकणातल्या निसर्गाला धोका पोहोचवून आम्ही कधीच रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन करणार नाही. स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याने कॉंग्रेसचाही याला कायम विरोधच राहील असे नाना पटोले यावेळी म्हणाले.