बदलत्या काळात आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्न मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. मात्र, अद्याप जुन्या रितीरिवाजांना पाळून असलेल्या एका कुटुंबातील मुलाने लग्नाकरिता एका महिलेस पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या पित्यासह कुटुंबाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील पारगाव (ता. दौंड) येथे एकाच कुटुंबातील ७ मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांना सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे. यात ३ लहान मुलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह सापडले. त्यानंतर दुपार नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
यामध्ये मोहन उत्तम पवार (५०), संगीता मोहन पवार (४५, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई), त्यांचे जावई श्यामराव पंडित फुलवरे (३२), त्यांची पत्नी राणी श्यामराव फुलवरे (२७) श्यामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश श्यामराव फुलवरे (७) छोटू श्यामराव फुलवरे (५) आणि कृष्णा (३) (रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद असे एकूण ७ जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आले आहेत. फुलवरे कुटुंबीय एक वर्षापासून निघोज (ता. पारनेर) येथे कामासाठी गेलेले होते. पवार पती-पत्नी हे फुलवरे यांचे सासू-सासरे आहेत. याबाबत यवत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मोहन पवार हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करीत. मोहन पवार हे निघोज गावात पालावर राहत होते. त्यावेळी त्यांचा छोटा मुलगा अनिल पवार (२०) याने त्यांच्याच वडार समाजातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला १७ जानेवारी रोजी लग्नाकरिता पळवून नेले होते.
अनिलने महिलेला पळवून नेल्याचे समजताच मोहन पवार यांनी त्यांच्यापासून पुण्यात विभक्त राहत असलेला मोठा मुलगा राहुल पवार यास फोन करून माहिती दिली. त्याला ती महिला परत आणण्यास सांग अन्यथा आम्ही विष घेऊन कुटुंबासह आत्महत्या करू, असे सांगितले होते. त्यानंतर त्या दिवशी रात्री मोहन पवार हे त्यांच्या कुटुंबास घेऊन दुसरीकडे निघून गेले आणि त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.