(पुणे)
पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जात असताना आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. तर मला जीवे मारण्याचा हा पूर्व नियोजित कट होता. या प्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे. अशी प्रवृत्ती राजकारणात निर्माण होत असेल तर ती ठेचून काढली पाहिजे, या हल्ल्यानं मी घाबरणार नाही. मी शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही असे आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
पुण्यात आदित्य ठाकरे यांच्या सभेदरम्यान उदय सामंत याचा जाणारा ताफा अडवत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान काहींनी दगड मारल्याने उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे तर गाडीतील एक जखमी झाला आहे. या हल्ल्या प्रकरणी प्रसार माध्यमांशी बोलतांना उदय सामंत यांनी खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. पुण्याच्या कात्रज चौकात हा मोठा राडा झाला. राड्यानंतर उदय सामंत कोथरुड पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. सामंतांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या गाडीची मागची काच पूर्णपणे फुटली आहे.
हल्ल्याचा थरार यावेळी सांगताना, “माझी गाडी सिग्नलला थांबली होती. सिग्नलला थांबल्यामुळे मी कुठेही घाई न करता थांबलेलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येवून थांबल्या. त्या गाड्यांमधून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हातात बेस वॉलची स्टिक होती. तर दुसऱ्याच्या हातात दगड बांधलेला होता. मला ते समोर येवून समोरुन शिव्या घालत होते. तर दुसऱ्या बाजूला 50 ते 60 लोकांचा मॉब होता. मी डाव्या बाजूला बघितलं, जेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी माझं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होते, त्यांच्या हातात सळई होत्या. ज्याने हा प्रकार केला होता ते काही लोकांना शूटिंग करायला सांगत होते. त्यांनी शिवीगाळ करुन गाडीवर चढून मला मारण्याचा प्रयत्न केला”, अशी धक्कादायक माहिती उदय सामंत यांनी दिली.
कुणीतरी सुपारी देऊन माझ्यावर हल्ला करायला सांगितला होता. त्यावेळी नुकतीच आदित्य ठाकरे यांची सभा झाली होती. सभा संपल्यानंतर तिथून बाहेर पडताना काही लोकांच्या हातात हत्यारं आणि दगडी होती. हे लोक मी जात असतांना माझ्या गाडीच्या आडवे आले. माझी गाडी थांबवत गाडीवर दगड मारले. ज्यांची सभा होती त्यांच्या सभेत ही हत्यारे आणि दगडी कशी आली असा सवाल त्यांनी यावेळी केला. संबंधित लोक शिवीगाळ करत होते. या हल्ल्यामुळे मी शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही. तर ही साथ अधिक मजबूत होणार आहे. माझ्या आई वडिलांची पुण्याई आणि देवाची कृपी म्हणून मी या हल्ल्यातून वाचलो, असेही सामंत म्हणाले.