मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर केला जाणार होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंचे एन्काऊंटर घडवण्यात कुणाचा सहभाग होता, याबद्दल सूचक वक्तव्यही संजय गायकवाड यांनी केले आहे.
संजय गायकवाड यांचा सर्व रोख यापूर्वी असलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांवर होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, एकनाथ शिंदेंना दुसरे काही देणार नव्हते, त्यांना ‘मौत’ देणार होते, मौत. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचा एन्काऊंटर करणार होते. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढली होती. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. मी अतिशय जबाबदारीने मोठा गौप्यस्फोट करीत आहे, असा दावा गायकवाड यांनी केला.
एकनाथ शिंदे गडचिरोली पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. त्यावेळी शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शंभुराजे देसाई गृहमंत्री होते. त्यांच्या घरी बैठक सुरू होती. त्यावेळी मातोश्रीवरून फोन आला आणि एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असे सांगण्यात आले. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. त्यांना नक्षलींच्या हातून मारायचे होते. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली, असा दावा संजय गायकवाड यांनी केला.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. राऊत यांना मला सांगायचे की, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचा जो ललित पाटील सोबत फोटो आहे, तो फोटो आधी पाहावा. मग उद्धव ठाकरे यांचे ललित पाटीलशी संबंध कसे ? असा आरोप आम्ही करायचा का? याचं आधी उत्तर द्या. बिनबुडाचे आरोप करायचे, सरकारला बदनाम करायचं हा यांचा रोजचा कार्यक्रम झाला आहे. हे कट कारस्थान सरकारला बदनाम करण्याचं आहे. याचा आम्ही निषेध करतो. काही हाती लागणार नाही आणि तुमच्याच अडचणी वाढतील, असा इशाराच त्यांनी दिला. निवडणुकीनंतर ज्यांच्याकडे 145 चा आकडा असेल त्यांचाच मुख्यमंत्री होईल. पण विधानसभेची निवडणूक ही फक्त एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच होणार आहे. तेच मुख्यमंत्री राहतील, असंही संजय गायकवाड यांनी सांगितलं.