(जळगाव)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना रविवारी दुपारी हृयविकाराचा झटका आला. एकनाथ खडसेंची मुलगी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. एकनाथ खडसेंना हवाई रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी जळगावहून मुंबईला नेण्यात आले आहे.
खडसे हे जळगावातील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना हार्टअटॅकचा झटका आला आहे. एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसेंना अचानक छातीमध्ये दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना जळगावच्या गजानन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर एकनाथ खडसेंना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे कळले. त्यामुळे खडसेंना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घेतला. त्यासाठी खडसेंच्या मुलीनी शिंदे यांना फोन केल्यानंतर त्यांनी हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. सध्या एकनाथ शिंदे साता-यातील त्यांच्या दरे या गावी होते. त्यांना खडसेंच्या प्रकृतीची माहिती मिळल्यानंतर हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचा आदेश दिला.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत होता. त्यानंतर रविवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर खडसेंना कार्यकर्त्यांनी त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी पुजाअर्जा सुरू केली आहे.