(मुंबई)
भोसरी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी फाईल सत्तातरानंतर पुन्हा एकदा उघडली जाणार आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच 31 जानेवारीपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून अहवालही न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे एकनाथ खडसे आणि कुटुंबियांच्या इतरही आर्थिक व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसें यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
अँटी करप्शनकडून पूर्णपणे चौकशी होऊन याचा क्लोजर रिपोर्ट दोन वर्षांपूर्वी न्यायालयात सादर करण्यात आला. आता मात्र राज्य सरकारने आपल्याच तपासणी अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत पुन्हा चौकशी अहवाल सादर केला असून यामध्ये कुठलेही तथ्य नसून आपण यात निर्दोष असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.