(क्रीडा)
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. मागच्या वर्षी 30 डिसेंबर रोजी त्याचा अपघात झाला होता. या अपघातातून तो थोडक्यात बचावला होता. मात्र तो गंभीर जखमी झाला होता. आता तो बऱ्यापैकी बरा झाला असून सध्या एनसीएमध्ये आहे. तो लवकरच टीम इंडियात पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ऋषभ पंतने शेवटचा कसोटी सामना डिसेंबरमध्येच खेळला होता, जेव्हा भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. यानंतर त्याचा अपघात झाला होता. या अपघाताला आता सात महिने झाले आहेत. या कालावधीत त्याने एकही सामना खेळला नाही. तरीदेखील ऋषभ पंतचा जलवा कायम आहे. नुकतीच आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये तो 10 व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे अव्वल 10 मध्ये ऋषभ पंत सोडला तर एकही भारतीय नाही आहे.
या क्रमवारीत केन विल्यमसन आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत 758 रेटिंगसह 10 व्या स्थानी आहे तर रोहित शर्मा 729 रेटिंगसह 12व्या आणि विराट कोहली 700 रेटिंगसह 14व्या क्रमांकावर आहे. आता टीम इंडिया 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी खेळणार आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत नसला तरी विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे या कसोटीमध्ये दमदार कामगिरी करून रोहित आणि विराट ऋषभ पंतला मागे टाकू शकतात.