रत्नागिरी : उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेले दोन दिवस पाऊस पडत असताना रत्नागिरी जिल्ह्यात पारा ३६ अंश सेल्सिअसवर पोचला आहे. कडकडीत उन्हामुळे जिल्हावासीय कासावीस झाले असून आरोग्याच्या तक्रारी वाढणार आहेत. या वातावरणाचा परिणाम हापूसवर झाला असून आंबा भाजून गळू लागला आहे. त्यात साका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर बारीक कैरी पिवळी पडून गळू लागली आहे.
हवामान खात्याने ट्विट करत राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचा प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यात दिसत आहे. शनिवारपासून (ता. १२) पारा ३६ अंश पार करुन वर गेला आहे. किमान तापमान १७. ५ अंशापर्यंत आहे. दिवसा कडकडीत उन्हासह उष्म्यांच्या झळांनी जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. तीच परिस्थिती रात्रीच्यावेळीही आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात कमाल पारा ३२ अंश आणि किमान १४ अंशांपर्यंत होता. त्यामुळे यंदाचा मार्च चांगलाच कडकडीत जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा उष्मा वाढला आहे. सुर्य आग ओकतोय की काय, अशी स्थिती सकाळी ११ वाजल्यानंतर नागरिकांना जाणवते. परिणामी, शीतपेयांना मागणी वाढली असून एसीचा वापर वाढलेला आहे. रणरणत्या उन्हामुळे नागरिकांनीही दुपारी घरीच बसणे पसंत केल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. ही उष्णतेची लाट अजून राहणार असून पालघर जिल्ह्यात त्याचा प्रभाव सर्वाधिक राहणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही उष्म्याचा प्रभाव जाणवत राहील.
कैरी पिवळी होऊन पडून जाते..
ऐन हंगामात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने कोकणातील हापूससह वायंगणी शेती संकटात आली आहे. आंबा, काजूसह कोकमाला फटका बसणार आहे. उन्हामुळे आंबा भाजत असून तो गळून जात आहे. फळामध्ये साका होऊन ते वाया जाऊ शकते. यंदा फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मोहोराला काहीप्रमाणात फळं लागली आहेत. वाटण्यापेक्षाही थोडी मोठा आकार असलेली कैरी पिवळी पडून पडून जाते. हे मोठे नुकसान यंदा बागायतदाराला सहन करावे लागत आहे. उन्हाच्या चटक्यामुळे फळ भाजते, तर बारीक कैरी पिवळी पडून गळून जाते. फेब्रुवारीतील अवकाळीतून कैरी वाचविण्यासाठी केलेली औषध फवारणी वाया गेली. बारीक कैरीला तापमान सहन होत नसल्याने नुकसान झाले आहे.
– देवेंद्र झापडेकर,आंबा बागायतदार