(गुहागर)
गुहागर तालुक्यातील उमराठ- हेदवी या दोन गावांची ग्रामदेवता श्री नवलाई देवी असून या ग्रामदेवतेचे पुरातन मंदिर निसर्गाच्या हिरव्यागार वनराईच्या सानिध्यात वसलेले आहे. तेथील सदैव निरव शांतता, नवनाडी येथील डोंगराच्या कडेकपारीतून झुळझुळ वाहणारे पाण्याचे झरे आणि पावसाळ्यात उंच कड्यावरून झेपावणारा धबधबा, पर्यटकांना आणि सर्वांनाच भुरळ पाडणारे असे विलोभनीय सौंदर्य, हे या श्री नवलाई देवी मंदिर परिसराचे खास वैशिष्ट्य आहे.
श्री नवलाई देवी मंदिर हे साधारणतः ३५० वर्षां पुर्वीचे एक पुरातन जागृत देवस्थान आहे. या मंदिरात कोकणात असलेल्या प्रमुख देव-देवतांची प्रतिस्थापना केलेली आहे. या मंदिरात श्रद्धेने नतमस्तक झाल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी या श्री नवलाई देवीची आख्यायिका आहे. येणाऱ्या भाविकांनी दर्शन घेऊन मंदिरात काही वेळ ध्यानस्थ बसल्यास एक वेगळाच आनंद, समाधान व अनुभूती भक्तांना येते असेही अनुभवी भक्त सांगतात.
अशा या श्री नवलाई देवी मंदिरात वर्षभर उमराठ व हेदवी गावातील ग्रामस्थ सामुहिक सण/ उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. त्यातील एक उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. मंदिरातील नियमित पुजा-अर्चा व देखभाल करण्यासाठी दोन्ही गावांतील पुजारी आहेत. या वर्षी सुद्धा रविवार दि.१५.१०.२०२३ आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेच्या दिवशी उमराठ गावातील चर्तुशीमेच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे मंदिराची सजावट करून देवीला रूपे लावले आणि मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना केली.
पुढे नऊ दिवस दसऱ्या पर्यंत मंदिरात दररोज ढोल व घंटानादाच्या सुमधूर स्वरात पुजाअर्चा चालू असते. तसेच भजन, कीर्तन, प्रवचन व दांडियानृत्य अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या वर्षी सुद्धा शनिवार दि. २१.१०.२०२३ रोजी साखरी आगर गावातील पुर्वापार प्रसिद्ध असलेले गोंधळी कै. महादेव व कै. पंढरीनाथ बिर्जे यांचे वंशज श्री. पल्लवी बिर्जे आणि सहकारी बंधू यांनी सुश्राव्य कथाकथनाने देवीचा गोंधळ घालून भाविकांना प्रबोधन केले.
सुरूवातीला घटस्थापनेसोबत मंदिराच्या गाभाऱ्यात लाकडी चौकड असलेल्या कुंडामध्ये मिश्र कडधान्य पेरले जाते व दररोज पुजारी फक्त पुजा करताना थोडे पाणी शिंपतात. घटस्थापने पासून दसरा – विजया दशमी पर्यंत फक्त समईच्या प्रकाशात त्या रोपांची वाढ होत असते, त्याला रोव म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचा सुर्य प्रकाश नसताना सुद्धा फक्त समईच्या प्रकाशात त्या रोवाची एक सारखी समान भरगच्च वाढ होते. हि एक नैसर्गिक किमया आहे. पंचक्रोशीतील असंख्य भाविक मंडळी हे पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी खास येतात.
शेवटी दसऱ्याच्या दिवसी देवीचे रूपे उतरविण्याचा कार्यक्रम देवीचे मानकरी आणि सर्व वाड्यांतील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत केला जातो. त्यानंतर सर्व ग्रामस्थ देवळातील देवाना “तुम्ही घ्या सोने, मला द्या रूपे” असा आर्जव करतात आणि सर्व ग्रामस्थ सुद्धा मंदिराच्या प्रांगणात एकमेकांची गळाभेट करून दसऱ्याचे सोने लुटतात.