(गुहागर)
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने विशेष ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबीर दि. १७.१२.२०२३ ते २३.१२.२०२३ या कालावधीत ग्रामपंचायत उमराठ कार्यक्षेत्रात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे रविवार दि. १७.१२.२०२३ रोजी दुपारी ४ वा. उमराठ नवलाई देवीची सहाण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन समारंभ पार पडला.
यावेळी काॅलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण सनये, प्रा. डॉ. प्रसाद भागवत, सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. सौम्या चौघुले तसेच उपसरपंच सुरज घाडे, ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे भाऊ, तंटामुक्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष कृष्णा गोरिवले, माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, वसंत कदम, पोलीस पाटील वासंती आंबेकर आणि काॅलेजचे सुमारे १०० विद्यार्थी मुले-मुली उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबीरात ग्रामीण सुधारणा व श्रमप्रतिष्ठा संवर्धनाबरोबरच व्यक्तीमत्व विकासाकरिता अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. या निवासी शिबीराच्या दैनंदिन कार्यक्रमातील सोमवार दि. १८.१२.२०२३ च्या पहिल्या सत्रात सकाळी ७ ते ११ च्या दरम्याने उमराठ गावातील घाडे-गोरिवलेवाडी नदी, धारवाडी – डागवाडी केतकवणे नदी आणि कदमवाडी व जालगावकर वाडी येथील टाळई नदी या ठिकाणी नदीतील पाणी साठवण्यासाठी चार बंधारे बांधण्यात आले. या कामी संबंधित वाडीतील ग्रामस्थ मंडळी आणि काॅलेजचे विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले.
उर्वरित दिवसांत सकाळच्या सत्रात श्रमदानातून गावातील सर्व १० वाड्यांतील स्वच्छता मोहीम अंतर्गत शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, सभागृहे, मंदिरे/ विहार, पाण्याचे स्रोत, पाणवटे यांची साफसफाई, तसेच गावातील सर्व पाणीपुरवठा टाक्यांचे चौथरे आणि रस्त्यालगतच्या घरांच्या भिंती, एस.टी पीकअप यांची रंगरंगोटी करून त्यांवर स्वच्छता अभियानातील सुचना, सुविचार, गणिती सुत्रे लिहून बोलक्या भिंती करण्यात येणार आहेत.
शिवाय दररोज दुपारच्या सत्रात प्रति दिन डाॅ. मनोज पाटील – राष्ट्र विकासासाठी तरूणांचे योगदान, सुरेश आंबेकर – सामाजिक न्यायासाठी पत्रकारिता, प्रा. संजय काशीद – पर्यटनातील व्यावसायिक संधी, डाॅ. सचिन ओक – तारुण्यातच तरूण्य जपू आणि अॅड. सुशील अवेरे यांचे मानवाधिकार :अर्थ आणि महत्व यावर व्याख्याने होणार आहेत. शेवटच्या दिवशी काॅलेजच्या मुला-मुलींचे करमणुकीच्या कार्यक्रमांतर्गत पथनाट्ये, डान्स, रेकॉर्ड डान्स होणार आहेत. त्या नंतर शेवटी सरपंच जनार्दन आंबेकर आणि इतर मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शनिवार दि. २३.१२.२०२३ रोजी कोंडवीवाडी उत्कर्ष मंडळाच्या श्री. सत्यनारायण पुजा सभागृहात शिबीराची सांगता होणार आहे.
या संपूर्ण शिबीराचे नियोजन पाटपन्हाळे काॅलेजचे प्रा. प्रविण सनये सर आणि विद्यार्थी टिम उत्साहात व उत्तम प्रकारे करत असून ग्रामस्थांच्यावतीने समन्वयक म्हणून कामकाज माजी सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गोरिवले, ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे भाऊ, उपसरपंच सुरज घाडे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक अनिल अवेरे उत्कृष्टपणे करत आहेत.
या कामी सर्व वाड्यांतील वाडी प्रमुख/अध्यक्ष – नामदेव पवार, नारायण गावणंग, शशिकांत गावणंग, संदीप गावणंग, भिकू मालप, गोविंद धनावडे, महादेव आंबेकर, अशोक जालगावकर, विनायक कदम, आजी/माजी तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा गोरिवले, संदिप गोरिवले, वसंत कदम, पोलीस पाटील वासंती आंबेकर, मुख्याध्यापक अवेरे सर तसेच मुला-मुलींची राहण्याची सोय करणारे घाडेवाडीतील ग्रामस्थ नरेंद्र डिंगणकर व भरत घाडे आणि घाडेवाडी/गोरिवलेवाडीतील ग्रामस्थांचे तसेच सनी गोरिवले, श्रीकांत कदम, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, शाईस दवंडे मोठे सक्रिय सहभाग आणि मोलाचे योगदान लाभले आहे. या सर्वांचे ग्राम. उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी कौतुक करून आभारीही मानले आहेत.