(गुहागर)
गुहागर तालुक्यातील नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणजे उमराठ प्रिमियर लीग. या स्पर्धेचे दुसरे पर्व नुकतेच रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी चंदनसार, विरार पूर्व येथे मोठ्या उत्साहात आणि खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडले.या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरला तो कोंडवी वाडी क्रिकेट संघ.
असे म्हणतात, फिनिक्स पक्षी स्वतः च्याच राखेतून पुन्हा जन्म घेतो. तसेच काहीसे या संघांचे झाले. उमराठ प्रिमीयर लीग (२०२२) च्या पहिल्या पर्वात कोंडवी वाडी हा एकमेव संघ असा होता की, ज्याला एकही मॅच जिंकता आली नव्हती. तसेच ह्या स्पर्धेतील पहिली मॅच गमावली असताना पुढील सर्व सामन्यात चमकदार कामगिरी करत सेमी फायनल मध्ये दाखल झाला.
सेमी फायनल मध्ये बलाढ्य समजल्या जाणाऱ्या आणि गतवर्षीचा विजेता ठरलेल्या आंबेकर वाडी क्रिकेट संघाला नमवून हा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आणि त्यात मुकाबला झाला तो धनावडे वाडी या क्रिकेट संघाशी. धनावडे वाडीने क्रिकेट संघाने शर्थीचे प्रयत्न करत चिवट झुंज देऊन ‘हम भी किसी से कम नहीं’ चा जणू इशाराच दिला. पण अटी-तटीच्या सामन्यात धनावडे वाडी संघ जिंकतो असे वाटतं असताना, दैवाने दिलेल्या साथीने आणि अवांतर धावाच्या जोरावर कोंडवी वाडी क्रिकेट संघाने अखेर या स्पर्धेच्या चषकावर आपले नाव दिमाखात कॊरले.
तत्पूर्वी गेल्या वर्षीच्या अपयशी ठरलेला संघ पुन्हा जोमाने तयारी करू लागला, सरावात घाम गाळू लागला. गेल्या वर्षी झालेल्या चुका शोधून त्या सुधारणे, प्रक्टिस वेळी घेतलेल्या मॅचेस व त्यातून जिंकलेल्या काही मॅचेस मधून आलेला आत्मविश्वास. जिथे मॅच होणार त्याच ग्राउंड वरील पिचवर जाऊन खेळणे. बॅटींग क्रमवारीतील बदल ह्या सर्व जमेच्या बाजू ठरल्या. दर रविवारी सराव चालू असताना, अघोरीं काळाचा आघात कोंडवी वाडीवर झाला. कोंडवी वाडीचे प्रमुख व मार्गदर्शक श्री. सुरेशदादा गावणंग यांच्या आकस्मिक निधनाने कोंडवी वाडी वर दुःखाचा डोंगर कोसळला असता त्या दुःखातून सावरून हा संघ पुन्हा मैदानात उतरला आणि हि ट्रॉफी जिकूंन सुरेशदादा गावणंग यांना आदरांजली अर्पण केली.
फलंदाजीत नेहमी सातत्य राखणारा कोंडवी वाडीचा धडाकेबाज फलंदाज सतिष गावणंग याने गेल्या वर्षी केलेल्या षटकार -चौकारांची आताशबाजी यावर्षी सुद्धा केली आणि तिला जोड म्हणून उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा केली. संपूर्ण मालिकेत त्याने उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावला व आपण एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे याची झलक संपूर्ण उमराठ गावाला दाखवली, त्याला उत्तम साथ लाभली ती निखिल गावणंगची, ज्याने एकेरी-दुहेरी धाव घेत धावफलक हलता ठेवला. इतर खेळाडूंनीही आपापल्या प्रकारे योगदान देत संघाला ही मानाची ट्रॉफी आणण्यात मोलाचा वाटा उचलला. सुरेशदादा गावणंग यांची प्रतिमा व नाव असलेली हि ट्रॉफी कोंडवी वाडी क्रिकेट संघाकडे आली हे कोंडवी वाडी क्रिकेट संघांचे भाग्यच म्हणावे लागेल.
मालिकावीर ठरला तो धनावडे वाडी क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू महेंद्र धनावडे, तर अभिषेक जालगावकर मालिकेतील उत्कृष्ट फलंदाज ठरला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उमराठ प्रिमियर लीगचे अध्यक्ष श्री. शशिकांत पोस्कर, महेशदादा आंबेकर, सेक्रेटरी श्री.महेंद्रआंबेकर, धीरज घाडे,महेंद्र गावणंग, संदीप गावणंग आणि पूर्ण टीम यांनी विशेष योगदान दिले. कोंडवी वाडी क्रिकेट संघात भरत धनावडे (कर्णधार), सतीश गावणंग (उप कर्णधार), मनोज गावणंग, वैभव धनावडे, संदेश गावणंग, उमेश गावणंग, अशोक गावणंग, निखिल गावणंग, आशिष गावणंग, स्वप्नील गावणंग, संकेत गावणंग, प्रथमेश गावणंग, दिपेश गावणंग, सौरभ धनावडे, विवेक गावणंग, मुकुंद धनावडे हे खेळाडू होते.
सदर स्पर्धा उत्तम नियोजनात आणि मोठ्या उत्साहात पार पाडल्याबद्दल ग्रामपंचायत उमराठचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर यांनी सदर स्पर्धा आयोजकांचे तसेच सहभागी टिमच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.