(नवी दिल्ली)
देश सध्या मोठ्या उष्णतेच्या तडाख्यातून जात आहे. अशा परिस्थितीत विजेचे भारनियमन व्हायला नकाे, असे निर्देश केंद्र सरकारने वीज कंपन्यांना दिले आहेत. हाेळीदरम्यान देशातील अनेक भागांत पाऊस आणि गारपीट झाली. मात्र, आता ऊन तापायला सुरुवात झाली आहे. वाढत्या तापमानासाेबतच गर्मी वाढणार असून त्यामुळे विजेची मागणीही वाढणार आहे. अशावेळी काेणत्याही परिस्थितीत विजेचे भारनियमन करू नका असे निर्देश केंद्र सरकारने वीज कंपन्यांना दिले आहेत.
केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी नुकतीच वीज, काेळसा व रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत बैठक घेतली. त्यात विजेच्या वाढत्या मागणीबाबत चर्चा करण्यात आली. विजेची मागणी पूर्ण करण्याशी संबंधित मुद्दे यावेळी चर्चिले गेले. त्यावेळी सिंह यांनी स्पष्ट केले, की उन्हाळ्यात भारनियमन व्हायला नकाे. तर पुढील काही महिन्यांमध्ये वीज वापराकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या.
देशाचा जीडीपी वाढीचा दर सुमारे ७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्यासाेबतच देशातील विजेची मागणी दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये मागणी सुमारे १.४२ लाख युनिट एवढी राहू शकते. वर्षभरातील सर्वाधिक मागणी राहिल. मे महिन्यात मागणी घटून १.४१ लाख, तर नोव्हेंबरदरम्यान १.१७ लाख युनिट एवढी मागणी राहण्याचा अंदाज आहे.
विद्युत प्राधिकरणानुसार, यावर्षी एप्रिलमध्ये विजेची मागणी सर्वाेच्च पातळीवर राहू शकते. त्यानंतर दक्षिण भारतात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच मागणीत घट हाेईल. मान्सूनच्या आगमनानंतर मागणी घटेल. यावर्षी एप्रिलमध्ये विजेची मागणी २२९ गिगावॅट एवढी राहण्याचा अंदाज आहे.
यावर्षी विक्रमी विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने याेजना आखली आहे. त्यानुसार, औष्णिक वीजनिर्मिती केंद्राना देखभाल आणि दुरुस्तीचे काम आधीच पूर्ण करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हे काम हाती घेण्याची गरज भासणार नाही. तसेच सर्व केंद्रांना पूर्ण क्षमतेने काम सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १६ मार्चपासून त्याची अंमलबजावणी हाेणार आहे.
औष्णिक वीज केंद्रांमध्ये काेळशाचा पुरेसा साठा ठेवण्यासाठी पुरवठादेखील सुरळीत करण्यात येईल. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तयारी केली आहे.
एनटीपीसीला ५ हजार मेगावॅट क्षमतेचे गॅसवर आधारित वीजनिर्मिती केंद्र एप्रिल आणि मे महिन्यात कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी ‘गेल’ने वायू पुरवठादेखील सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.