(चिपळूण)
आर्थिक खर्च परवडत नसतानाही उदरनिर्वाहाचे साधन म्हणून येथील शेतकरी भातशेती करतो आहे. त्या जोडीला चार पैसे मिळतील, यासाठी भाजीपालाही करतो. दिवस-रात्र काबाड कष्टातून फुलविलेला भाजीचा मळा आणि भातशेतीची उनाड जनावरे नासधूस करू लागली आहेत. यामध्ये या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या उनाड गुरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी समितीचे माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम यांनी केली आहे.
यासंदर्भात श्री.मुकादम यांनी सांगितले की चिपळूण तालुक्यात छोटे-मोठे शेतकरी कष्ट करून भात पिकवतात. उदारनिर्वाह चालवावा म्हणून भाजीपालाही करत असतात.उनाड गुरं रात्रं-दिवस फिरुन भातशेती व भाजीपाला यांचे पूर्ण वाटोळे करत आहेत. त्याचबरोबर गाढवांचाही फार मोठा त्रास होत आहे.उनाड गुरे रस्त्याच्या मध्यभागी बसलेली असतात यामुळे दुचाकीवाल्यांचेही बरेच अपघात होत आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे कोंडवाडा काढायचा झालाच, तर ग्रामपंचायतीलाही परवडायचे नाही.तरी महाराष्ट्र शासनाने कोंडवाऱ्या संबंधित सुधारीत दर जाहीर करावे. ज्या शेतमालकाचे उनाड गुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे, त्याची कृषि अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, अशी मागणीही श्री.मुकादम यांनी केली आहे.तसेच यासंदर्भात दि.८ ऑगस्ट रोजी कृषि अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना शिष्टमंडळासह भेट देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शौकत मुकादम यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळामध्ये कळंबस्तेचे सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडिक, माजी सरपंच अरुण भुवड, चंद्रकांत सावंत, अंकूश शिगवण, विवेक महाडिक, सचिन शिंदे, संदेश गोरिवले, युवक अध्यक्ष समीर पवार यांचा समावेश आहे.