(मुंबई)
महाविकास आघाडीकडून मुंबईत आज महामोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. लफंग्यांना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असं ते महामोर्चातील भाषणामध्ये म्हणाले. ज्यांनी ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ असल्याचं त्यांनी सांगितलं.
संयुक्त महाराष्ट्रानंतर हे अफाट मोर्चाचं चित्र पहिल्यांदाच देशानं आणि जगानं पाहिलं असेल. बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही, तो झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे तोतये आहेत. दिल्लीपुढं बाळासाहेब कधी झुकले नव्हते. खुर्ची गेली तरी चालेल राज्याच्या अस्मितेशी तडजोड करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यपालांबाबत ते म्हणाले की, मी राज्यपालांना राज्यपाल मानत नाही. केंद्रात जो बसतो त्यांच्या घरी काम करणाऱ्यांना पाठवायचं नसतं. छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार लफंग्यांना नाही. हे राज्य लुटायला आलेले आहेत. महिलांविषयी अवमानकारक वक्तव्यावरही उद्धव ठाकरे संतापले.
ते पुढे म्हणाले, या गर्दीनं महाराष्ट्र द्वेष्यांचे डोळे उघडले असतील. मुंबईचे लचका तोडतायेत, प्रकल्प करत होते ती जागा बिल्डरच्या घशात जात आहे. आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून गेला पाहिजे. राज्यात आलेले उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात जाऊ द्यायचे. गावं कुरतडायची हे योग्य नाही. महाराष्ट्राला भिकेला लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही महाराष्ट्राची वज्रमुठ आहे जी महाराष्ट्र द्रोह्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडीच्यावतीने दिला.