(संगलट-खेड/ इकबाल जमादार)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व तालुक्यातील उधळे बुद्रूक गावाजवळील आणि भारत पेट्रोल पंपानजिक मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणा-या खासगी बस चालकाचा आपल्या ताब्यातील बसवरचा ताबा, झोपेच्या भरात सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोलेरो पिकअप टेंम्पो, बलकर कार, इनोव्हा कारला जोराची धडक दिली. या अपघातात बसचा क्लिनर रोशन हरी सरफरे (वय 28 रा भु तालुका राजापूर जि रत्नागिरी) हा जागीच ठार झाला. तर चालक व खबर देणार महेश राजाराम पेंढारकर रा. नांदगांव, ब्राह्मणवाडी, ता. चिपळूण हे जखमी झाले आहेत. इतर वाहनांचे व खासगी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हा अपघात आज मंगळवार दिनांक 03 मे 2022 रोजी घडला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. अपघाताची माहीती मिळताच येथील पोलीस ठाण्याचे पोउनि सोनावणे, पोलीस हवालदार प्रकाश मोरे, मपोशि किरण चव्हाण, पोलीस गाडीचा चालक वळवी, व जोयशी आदि कर्मचारी अपघातस्थळी दाखल होऊन अपघातात सापडलेल्या वाहनांच्या चालकांचे जाबजबाब तसेच जखमींची, मयताच्या नातेवाईकांचे जबाब, पंचनामा, आणि अपघातामुळे खोळंबलेल्या वहातुकीवर नियंत्रण ठेवत मदतकार्य करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्याचे काम केले. तसेच मयताचा मृतदेह कळबणीच्या उपजिल्हा रूग्णालयाच्या शवागृहात दाखल करण्यात आला आहे. तसेच जखमींना देखील उपचारार्थ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघाताला कारणीभूत व क्लिनर रोशन भु सरफरे याच्या मृत्यूस व स्वतःच्या व इतर प्रवाशांच्या छोट्या मोठ्या दुखापतीस व आपल्यासह इतर वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बस चालक महेश राजाराम पेंढारकर रा. चिपळूण यांचेवर येथील पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 132/2022 मध्ये भादवि 304(अ), 279, 337,338 व मोटर कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी चालक याला अटक करून न्यायालयात हजर केले. अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल हिंगे करीत आहेत.
अपघातस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीवरून मुंबई येथून गोव्याच्या दिशेने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी खासगी लक्झरी बस नंबर एमएच 04 jk 9732 या बसवरील चालक व खबर देणार महेश राजाराम पेंढारकर हा मुंबई ते गोवा महामार्गावर चालवित होता. बस महामार्गावरील उधळे बुद्रूक गावाजवळील भारत पेट्रोल पंपाजवळ आली असताना झोपेच्या भरात आपल्या ताब्यातील बसवरचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेली बलेरो पिकअप टेंम्पो नंबर एमएच 08 AP 3281, एमएच 04 JK 2753, इनोव्हा कार नंबर एमएच 06 AN 8442 या तीनही वाहनांना जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात बसचा क्लिनर रोशन हरी सरफरे हा जागीच ठार तर चालक व खबर देणार महेश राजाराम पेंढारकर रा. चिपळूण हा जखमी झाला. अशाप्रकारे उधळे बुद्रूक गावाजवळील पेट्रोल पंपानजिक झालेल्या चौरंगी अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली.
फोटो :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उधळे बुद्रूक गावाजवळील भारत पेट्रोल पंपानजिक झालेल्या चौरंगी अपघाताचे छायाचित्र (छाया इक्बाल जमादार संगलट खेड)