(रत्नागिरी/प्रतिनिधी)
राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी रत्नागिरितील रहाटाघर एस.टी. बसस्थानकाला शनिवारी सरप्राईज व्हिजिट दिल्यानंतर रहाटाघर एस.टी. बस स्थानक आता चकाचक झाले आहे. रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभाग व रत्नागिरी नगर परिषदेच्या विशेष सहकार्यातून बस स्थानकाचा परिसर, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या जागेची स्वच्छता, कर्मचा-यांच्या खोल्या आदींची साफसफाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्यामुळे जे.सी.बी.च्या सहाय्याने आगारातील बस पार्किंगच्या ठिकाणी जे खड्डे पडले होते ते खड्डे भरण्यात आले आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी रहाटाघर एस.टी. बस स्थानकाला सरप्राईज व्हिजिट देऊन बस स्थानक परिसराची पाहणी केली होती. यावेळी प्रसाधनागृहे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या आजुबाजुचा परिसर, खोल्या, आगाराचा आजुबाजुचा परिसर येथे कचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले निदर्शनास आले. त्यामुळे दुर्गंधीही निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवासी वर्गालाही खूप त्रास सहन करावा लागत होता हे देखील स्पष्ट झाले.
यावेळी ना.उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासकीय अधिका-यांना तात्काळ बोलावून या बस स्थानकाची स्वच्छता तात्काळ करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार सोमवार व मंगळवारी या एस.टी. आगाराची एस.टी. सफाई कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व रत्नागिरी नगर परिषद कर्मचा-यांनी स्वच्छता केली. यामुळे आगार आता चकाचक झालेले दिसून येत आहे. यावेळी एस.टी.आगाराचे इंजीनियर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सदर स्वच्छता कामात व खड्डे भरण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एस.टी. विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे व रत्नागिरी नगर परिषदेचे आभार व्यक्त केले आहेत.