(रत्नागिरी )
रत्नागिरीत उद्या 7 मे रोजी ‘शून्य सावली’ चा खगोलीय आविष्कार अनुभवता येणार आहे. या दिवशी दुपारी 12. 33 मिनिटांनी याची प्रचिती घेता येणार आहे. रत्नागिरीचे अक्षांश 16.98 असल्याने 7 मे रोजी ही घटना प्रत्यक्ष पाहता येईल.
‘सावलीचा सुंदर अभाव’ अर्थात शून्य सावली दिवस. असा दिवस पृथ्वीवर +23. 5 आणि – 23.5 अंश अक्षांश दरम्यानच्या ठिकाणी दरवर्षी दोनदा अनुभवता येतो. रोज दुपारच्या वेळी सूर्य कधीच डोक्यावर नसतो. तो थोडा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे झुकलेला असतो. +23.5 आणि -23.5 अक्षांश दरम्यानच्या ठिकाणांसाठी सूर्याचे अक्षांश दोनदा त्या ठिकाणांच्या अक्षांश एवढे असतात. एकदा उत्तरायणात आणि एकदा दक्षिणायनात, या दोन दिवशी सूर्य दुपारच्या वेळी अगदी डोक्यावर असतो आणि जमिनीवर वस्तूची सावली पडत नाही. ‘शून्य सावली दिवशी’ वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते.
महाराष्ट्रात येत्या 3 ते 31 मे पर्यंत असे शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहेत. रत्नागिरी येथे उद्या 7 मे रोजी हा खगोलीय आविष्कार अनुभवता येणार आहे. या दिवशी दुपारी 12.33 मिनिटांनी याची प्रचिती आपण घेऊ शकतो. रत्नागिरी चे अक्षांश 16.98 असल्याने 7 मे रोजी ही घटना प्रत्यक्षात पाहता येईल.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात खगोल अभ्यास केंद्रातर्फे शून्य सावली निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध खगोलीय प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक खगोलप्रेमींनी महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग जवळ उद्या 7 मे रोजी सकाळी 11.30 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केला आहे.