( रत्नागिरी/प्रतिनिधी )
शहरातील उद्यमनगर पटवर्धनवाडी रिक्षास्टॅन्ड जवळील रस्त्याच्या मध्यभागातून गटार आहे. सदरच्या गटारावर जी लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे ती वाहनधारकांना, पादचारांना सद्यस्थितीत अतिशय त्रासदायक होत आहे. सदरची जाळी रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे याच्यावरुन नेहमी वाहनाची वर्दळ चालू असते याचा काही भाग तुटलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे या भागातून जाणार्या वाहनांना फार मोठा त्रास होत आहे. या गटाराच्या एका बाजूला रत्नागिरी नगर परिषदेची हद्द आहे तर एका बाजूला शिरगाव ग्रामपंचायतीची हद्द सुरू होते. त्यामुळे हे काम कोणी करावे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या रस्त्यावरून नेहमी माजी नगरसेवक, माजी सरपंच, व सभासद या रस्त्यावरून ये-जा करत असतात तरीदेखील त्यांना या गटाराच्या जाळीवर लक्ष कसे देता येत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. खरोखरच या भागातील सभासदांचे लोकांच्या समस्यांकडे लक्ष आहे का? की फक्त निवडणुकीच्या वेळेस लोकांचा विचार होतो. याच भागामध्ये महिला रुग्णालय आहे काही दिवसांनी याच भागामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनाची ये-जा जास्त प्रमाणात होणार आहे. अशावेळी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? या गटाराच्या जाळीवर लक्ष देण्यासाठी कोणी वाली आहे का? असे या भागातील लोकांकडून बोलले जात आहे.