(मुंबई)
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नाही. त्यांनी परस्पर राजीनामा दिला, त्यांनी सहकारी पक्षांबरोबर डायलॉग ठेवायला हवा होता, असे वक्तव्य शरद पवारांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत केल्याबरोबर उद्धव ठाकरे सिल्वर ओक वर शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. मात्र मात्र ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांत जवळपास सव्वा तास खलबते झाली. द्धव ठाकरे हे सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेण्यासाठी गेले होते, यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत व सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.
ईव्हीएम तसेच गौतम अदानी यांच्या चौकशीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याच पुढे आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ईव्हीएमचे समर्थन करणारे वक्तव्य केलं होतं. तर शिवसेना ठाकरे गटाकडून त्या विरोधात वक्तव्य करण्यात आलेली आहेत. परस्पर विरोधी वक्तव्य होत असल्याने ठाकरे आणि पवारांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘सिल्वर ओक’ वर गेले असल्याची चर्चा आहे.
काल रात्री आठच्या सुमारास उद्धव ठाकरे हे मातोश्री वरून शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक येथे पोहोचले. दोन्ही पक्षांच्या प्रमुखांकडून आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही भेट असल्याचं बोलले जात आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधात महाविकास आघाडी एकजूट असल्याचं दाखवून देण्यासाठी मित्र पक्षांचं एकमत असण्याची गरज आहे. त्यामुळे आता दोन्ही बड्या नेत्यांकडून मतभेद दूर सारण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
राहुल गांधींनी केलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, ते सातत्याने उपस्थित करत असलेला अदानी मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन या चार मुद्द्यांवर महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची वेगवेगळी मते असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये उघड झाले आहे. त्यातही शरद पवारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा विषय लावून धरल्यावर त्याला छेद देणारे विधान अजितदादा पवारांनी केले. गौतम अदानी यांची बाजू पवारांनी उचलून धरल्यानंतर काँग्रेस हायकमांड त्या मुद्द्यावर विरोधात गेली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी काँग्रेसला बॅकफूटवर ढकलल्याच्या बातम्या आल्या. राहुल गांधी यांनी आपली तलवार म्यान केली, पण तरीही पवार सावरकरांचा मुद्दा त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलतच होते. आणि म्हणून काँग्रेस हायकमांड नाराज आहेत अशा बातम्याही आल्या.
या राजकीय पार्श्वभूमीवर काँग्रेसचा एकही नेता शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर पोहोचलेला नाही, तर फक्त उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक वर गेले आणि त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. याचा अर्थ दोन्ही नेत्यांची चर्चा ही संपूर्ण महाविकास आघाडीतील मतभेद मिटविण्यासंदर्भात आहे की त्या दोघांमध्येच तयार झालेल्या काही अविश्वासाच्या मुद्द्यांवर पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी आहे? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचा निकाल आता कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही क्षणी येऊ शकतो. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारचे भवितव्य, त्याचबरोबर महाराष्ट्रातली नवी राजकीय समीकरणे या विषयावर ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा सुरू आहे का?, यादेखील शंकेला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. मात्र याबाबत अधिकृतरित्या अद्याप तरी दोन्ही बाजूंकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवासाठी एकत्र असणे आवश्यक आहे. हे उद्धव ठाकरेंनीही छत्रपती संभाजीनगरच्या सभेत आम्ही एकत्रच आहोत हे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे मविआ ही सध्यातरी अभेद्य आहे. महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला आणि उमेदवाराला कोणता मतदारसंघ द्यावा, याची चाचपणी आता सुरु झाल्याची शक्यताही आहे. ठाकरे आणि पवार भेटीत या मुद्यावरही चर्चा झाली असावी, असे बोलले जात आहे.