(मुंबई)
ठाकरे आणि शिंदे गटानं शिवसेना पक्षावर दावा करताना निवडणूक आयोगाकडे लाखो प्रतिक्षापत्रे सादर केली आहेत. त्याची सखोल तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. या प्रतिज्ञापत्रांचीही पडताळणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात असताना त्यात ठाकरे गटानं सादर केलेली तब्बल २.५ लाख प्रतिज्ञापत्रं आयोगानं बाद ठरवली आहेत. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ठाकरे गटानं शिवसेनेवर दावा करताना एकूण ११ लाख प्रतित्रापत्रं निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. या प्रतिज्ञापत्रांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असताना अडीच लाख प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकीचा असल्याचं आढळून आले आहे. त्यामुळं आयोगानं ही प्रमाणपत्र बाद ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे गटाला नवीन नावासह चिन्ह दिलेलं असलं तरी शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही गट करताना दिसत आहेत. त्यामुळं आता शिवसेनेची अडीच लाख प्रतिज्ञापत्र रद्द केल्यानंतर शिंदे गटाचा शिवसेनेवर दावा मजबूत होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.