(मुंबई)
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येईल आणि महाविकास आघाडी तुटेल. त्यामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची वेळच येणार नाही, असा दावा सहा वर्षांसाठी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी केलेले नेते आशीष देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणात आता याचीच चर्चा सुरू झाली आहे. कोणालाही अपात्र व्हायला आवडणार नाही. एखादा पक्ष, नेता आपला आमदार अपात्र होऊ देणार नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. हे पाहता सध्याच्या महाविकास आघाडीमधल्या जागावाटप चर्चेला अर्थ नाही. आता उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे गट एकत्र येणार आहे. त्यानंतर एकत्रित शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काही दिवसांपूर्वी सुनावणी आली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर आम्ही तुमचे सरकार आणले असते, अशी सरन्यायाधीशांनी टिपण्णी केली. तर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे आदेश दिले.
आता विधानसभा अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार, शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. तत्पूर्वीच आशीष देशमुख यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येईल. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या आमदारांवर कारवाई करण्याची गरजच पडणार नाही. ही कारवाई सहा वर्षांसाठी असेल. ती झाली, तर अनेकांचे राजकीय करिअर संपेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.