(मुंबई)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर आता याबाबत गृह विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. गृहविभागाने म्हटले आहे की, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत आहे.
हे वर्गीकृत संरक्षण केंद्रीय यल्लो बुक नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेतही कपात करण्यात आल्याचे तसेच मातोश्रीची सुरक्षाही कमी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, यावर आता गृहविभागाने खुलासा करत या वृत्ताचे खंडन करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. याआधी कलानगरचे मुख्य प्रवेशद्वार, ड्रम गेट आणि मातोश्री निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था असे सुरक्षेचे 3 स्तर पार करून उद्धव ठाकरेंना भेटता यायचे. या तिन्ही स्तरातील अतिरिक्त पोलीस काढून घेण्यात आले आहेत.
ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या वांद्य्राच्या कलानगर येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या सुरक्षेत ३० वर्षांनंतर कपात करण्यात आली आहे. १९९३ साली झालेल्या दंगलीनंतर अतिरेक्यांचे लक्ष्य असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ‘मातोश्री’ बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबतच रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनाही पोलीस सुरक्षा पुरविण्यात आली होती.
दरम्यान, ठाकरे कुटुंबाची सुरक्षा हटवण्यात आल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, मातोश्रीची सुरक्षा कपात सध्याच्या गद्दार सरकारने केली आहे. मात्र दुसरीकडे ठाणे शहर आणि ठाणे जिल्हात प्रत्येक गद्दाराला आणि पदाधिकाऱ्यांना शेकडोच्या संस्खेने सुरक्षा पुरवली आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा ठिक आहे, पण ठाण्यातील नगरसेवक आणि त्यांच्या पत्नी, पीएला आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा दिली जाते आणि भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मातोश्रीची सुरक्षा कपात केली जाते हा निदंनिय प्रकार आहे. मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते उद्धव ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा काढल्या आहेत. परंतु मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी शिवसेना आणि शिवसैनिक ताकदीने खंबीर आहेत.