मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले आणि तसेच परत गेले. नुकसानग्रस्ताना काही दिले नाही. दोन दिवसांनंतर जाहीर करतो असे सांगून निघून गेले. मग तुम्ही आलात कशाला? कुणी बोलावलं तुम्हाला? मुख्यमंत्री पद म्हणजे एक जबाबदारी आहे. ह्यांना मुख्यमंत्री पदच कळलेले नाही. अधिकाऱ्यांना सुद्धा कळलेले नाही मुख्यमंत्री कशासाठी आलेत अशा शब्दात भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला आहे.
राणे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मजा मारतायत. काय सूचना दिल्या? जेमतेम दहा मिनिटं रत्नागिरी आणि तासभर सिंधुदुर्गमध्ये येण्या-जाण्यात वेळ गेला. आढावा कसला घेतला? मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून काय बघितलं? असा सवाल उपस्थित करत नुकसानग्रस्तांना भेटले देखील नाही असे हे राज्याचे मुख्यमंत्री. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची वाट लागली आहे. मागच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून ठाकरे सरकारने दिले नाहीत. कोकणवासीयांची अशी चेष्टा करायची असेल तर यापुढे मुख्यमंत्र्यांनी कोकणात येऊ नये असे खडेबोल निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहेत.