(मुंबई)
मुंबई येथे राज ठाकरे यांची काल रविवार 27 नोव्हेंबर रोजी सभा झाला. या सभेत त्यांनी सर्व पक्षावर आणि वाचाळवीरांवर सडकून टीका केली. गोरेगावमधील नेस्को सभागृहात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की, एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे उद्धव ठाकरे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले, असं राज ठाकरेंनी म्हटलं…
यावेळी राहुल गांधी यांच्यावर ही टीका केली. सावरकर यांच्याविषयी बोलणाऱ्या राहुल गांधींवर जोरदार प्रहार केला. सावरकर यांच्यावर बोलण्याची लायकी नाही असे म्हणत जोरदार हल्ला चढवला. तसेच राज्यपालांनाही खडसावले. ते म्हणाले, आपलं वय काय? आपण बोलतोय काय? काय चाललंय या महाराष्ट्रात? राज्यपाल पदावर बसलाय म्हणून मान राखतोय. नाहीत तर महारष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे. मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर मनसेच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आपली भूमिका आणि आंदोलनं काय आहेत हे सांगण्यासाठी आपण एक पुस्तिका काढणार आहोत. मनसेच्या आंदोलनाला सर्वाधिक यश मिळतंय. इतर पक्षांपेक्षा मनसेच्या आंदोलनाला यश मिळत. टोलनाक्याच्या आंदोलनानंतर 65 ते 67 टोलनाके बंद झाले. आंदोलन यशस्वी झालं. ज्यांनी निवडणुकांच्या तोंडावर टोल बंद करण्याची केवळ घोषणा केली त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत, आम्हाला प्रश्न विचारले जातात असेही ते म्हणाले.
बाळासाहेब जी भूमिका बोलत होते, भोंगे उतरले पाहिजे ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण भोंगे काढा असे नाही म्हणालो, नाही काढले, तर हनुमान चालीसा लावू असे सांगितले. पण अजून काही ठिकाणी चरबी जिरलेली नाही. जिथे जिथे हे सुरु असेल तर तिथे पोलिसांना तक्रार दाखल करा. तरीही झालं नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा, असेही ते म्हणाले.