मुंबई दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये देशातील व महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. खऱ्या शिवसेनेची चोरी झाली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
शिवसेनेच्या संदर्भातील घडामोडींवर बोलताना केजरीवाल यांनी भाजप व शिंदे सेनेवर निशाणा साधला. ‘मागच्या काही दिवसांत जे काही झालं ते पाहता मी हेच सांगू शकतो की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली आहे. त्यांच्या पक्षाचं नाव चोरलं गेलं, चिन्ह चोरलं गेलं. त्यांच्याकडं जे काही होतं, ते चोरलं गेलं. पण उद्धव यांचे वडील वाघ होते आणि ते वाघाचे पुत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळेलच, शिवाय येणाऱ्या सर्व निवडणुका उद्धव ठाकरे निर्विवाद जिंकतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणांचा वापर भेकड लोक करतात. त्यांना आमची भीती वाटते. म्हणूनच तर आमच्या घरी ईडी, सीबीआय येते. ही भीतीच आहे. त्यांना जे काय करायचं ते करू द्या. आम्ही तयार आहोत. जनता सगळं बघते आहे. शेवटी सत्याचा विजय होतो. खोटं हे खोटं असतं, सत्य हे सत्य असतं. विजय सत्याचाच होतो, असं केजरीवाल म्हणाले.
आगामी काळात आम आदमी पक्ष निवडणुका लढणार असेल तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता केजरीवाल यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. निवडणुका येतील तेव्हा तुम्हाला सर्व काही कळेल, असं ते म्हणाले.
पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत दिल्लीचे मुख्यमंत्री मा.श्री. अरविंद केजरीवाल यांची संयुक्त पत्रकार परिषद ⤵️
📍मातोश्री – LIVE#UddhavThackeray @ArvindKejriwal #MUMBAI #PC #MAHARASHTRA
🟨FRIDAY-2️⃣4️⃣-0️⃣2️⃣-2️⃣0️⃣2️⃣3️⃣🟨 https://t.co/HG839wUpnt
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 24, 2023