(संगमेश्वर)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘भारतरत्न लता मंगेशकर’ सन्मान स्वीकारण्यासाठी मुंबईमध्ये येतात. मात्र त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर जाण्याचे शिष्टाचार पाळणे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री जाणीवपूर्वक टाळतात. पंतप्रधानांचा याहून मोठा अपमान काय असू शकतो. हे सरकार आणि सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या सल्ल्याने प्रत्येक पाउल उचलतात. त्यांनी जी गोष्ट सांगितली असेल ती बाळासाहेबांची आज्ञा समजून निमुटपणे पालन करतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. विरोध विचारसरणीचा असावा; व्यक्तीचा नाही एवढी समज ज्या व्यक्तीला नाही असा माणूस आज दुर्दैवाने महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? अशी खरमरीत टीका भाजप संगमेश्वरचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी केली आहे.
सन्मान जरी नरेंद्रभाई मोदीजींचा असला तरी तो गुजरातचे माजी मुख्यमंत्री वा भाजप कार्यकर्ते म्हणून नसून देशाचे पंतप्रधान म्हणून होता. त्यामुळे देशाचे पंतप्रधान मित्र आहेत की विरोधक याचा कार्यक्रमाच्या उपस्थितीवर वास्तविक परिणाम होता कामा नये. त्यातही सन्मान ज्यांच्याकडून आहे अशा मंगेशकर ट्रस्टकडून विशेष निमंत्रितांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचे नाव समविष्ट होते. त्यातही या ट्रस्टचे सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहून मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे सौजन्य उद्धव ठाकरेंनी दाखवले असते तर आज नैतिकता शिकवायला लागली नसती. पण जसा अहंकार रावणाला झाला होता तसाच आता मातोश्रीनिवासी उद्धवजींना झाला आहे. त्यामुळे यापुढील काळात लंकादहन निश्चित होणार आहे. असा गर्भित इशारा अधटराव यांनी दिला.
हा कार्यक्रम काही आठवडे अगोदर ठरला होता. तसेच निमंत्रण देण्यात आले होते. मात्र राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी ज्या काही शिवसैनिकांनी मातोश्री भोवती गराडा केला होता, त्यापैकी वयोवृद्ध शिंदे आजींच्या घरी जाऊन आपण किती संवेदनशील मुख्यमंत्री आहोत हा आभास निर्माण करण्याचा दुबळा प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांनी केला. एवढी पोलीस फौज असताना वयोवृद्ध महिलेला तळपत्या उन्हात बसावे लागले तेव्हा हे बाहेर येऊ शकले नाहीत. कदाचित राणा पतीपत्नींचे भय वाटले असावे. पण देशाचे नेते राज्यात आलेले असताना केवळ अहंभावना जोपासण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले हे कृत्य निर्भर्त्सनात्मक होते. शिवाय तेथे जाऊन केले काय तर काहीच नाही. आजीनेच दोन गोष्टी मागितल्या एक म्हणजे घर आणि दुसरे म्हणजे मुलाला नोकरी. मुळात या मागण्या ते मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करणार की पक्षप्रमुख म्हणुन? हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री म्हणुन करणार असतील तर मग रोज एकेक विरोधी आमदार-खासदार हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीवर येतील आणि सोबत 100 ते 1000 वयोवृद्ध शिवसैनिक महिलांना घेऊन मातोश्रीच्या रक्षणासाठी उभे करतील. द्या प्रत्येकीला घर आणि मुलाला नोकरी.
एकंदरीत महाराष्ट्राचा अपमान म्हणुन गळा काढणार्या प्रत्येकाने लक्षात ठेवावे की उद्धव ठाकरेंनी केवळ आमचे नेते किंवा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा अवमान केला नाही तर आज ते ज्या खुर्चीत बसले आहेत त्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीलाही कलंकित केले आहे. जनता याचे उत्तर निवडणुकीतून देईल. आम्ही सर्व कार्यकर्ते नक्कीच यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी सांगितले.