(रत्नागिरी / प्रतिनिधी)
उदय सामंत म्हणजे निरुद्योगी उद्योग मंत्री आहेत. उद्योग मंत्री पद सांभाळल्यापासून सामंत यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवण्याचे काम केलं आहे. हूजरेगिरी आणि लाचारी करणे या पलीकडे उदय सामंत यांना काही येत नसल्याची सडकून टिका शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राउत यांनी केली आहे.
रत्नागिरीत बुधवारी खासदार विनायक राउत यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, सिंधुदुर्गातील पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला घालवण्यामागे आदित्य ठाकरेंचं तुम्ही नाव घेत असाल तर मंत्री सामंत हे सपशेल खोटे बोलत आहेत. आणि असा मंत्री या राज्याला या अगोदर मिळाला नसल्याचे खासदार राउत यांनी यावेळी बोलताना सांगितले. महानंदा दूध प्रकल्प हा गुजरातच्या अमूल कंपनीला देण्याचा घाट मिंधे सरकारने घातला आहे. महानंदाच्या मालमत्तेवरती गुजरात आणि अमुलचा डोळा असल्याचे सांगितले.
मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर या दोन्ही मंत्र्यांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये उडी मारून आपापला स्वार्थ साधला आहे. रत्नागिरी विधानसभा आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या आमदारांना आम्ही घरी बसवणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आमदार इथे निवडून आणणार आहोत. येणाऱया लोकसभा निवडणुकीमध्ये 30 खासदार हे इंडिया आघाडीचे महाराष्ट्रातून निवडून येतील असेही खासदार राउत यांनी सांगितले. आगामी निवडणूकीबाबत महायुतीचा दावा नक्कीच फोल ठरणार असून काही दिवसात याचे चित्र स्पष्ट होईल. तिकीट वाटपाचा जेव्हा विषय येईल, तेव्हा हे सर्व एकमेकांच्या उरावर बसतील. एकमेकांच्या पक्षाला संपवण्याचा हे प्रयत्न करतील असेही त्यांनी सांगितले. उदय समंत यांचा फील्डिंग लावायचा नेहमीचा धंदा झालाय.
उद्या सामंत यावेळी सुद्धा एबी फॉर्म तिकडचा घेतील आणि उडी भाजपमध्ये मारतील. रेस कोर्स आणि मानखुर्द या दोन्ही जागा घशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय. मध्ये आणखी काय दुरुस्ती करणार, समान नागरी कायदा जरूर आणावा. देशात समान नागरी कायदा आणला तर असेल तर कोणाला नकोय.
रामाच्या नावाचा उपयोग केवळ राजकीय स्वार्थासाठी
रामाच्या नावाचा उपयोग केवळ राजकीय स्वार्थासाठी भाजप करत आहे. अयोध्यातले निमंत्रण अजूनही उद्धव ठाकरे यांना मिळालेले नाही. रामलल्लाच्या नावावर स्वतचं भलं कसं करता येईल यासाठी ही सर्व नाटकं आहेत. रामलल्लाची प्रतिष्ठापना रामनवमीला झाली पाहिजे होती. फडणवीस यांना स्मृतिभ्रंश झाला आहे मुख्यमंत्री पदावरून हाकलल्यानंतर नंतर त्यांना मागचं काही आठवत नाहीये. यापूर्वीची अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी यांची भाषणे त्यांनी ऐकावीत जरांगे पाटील यांनी पुकारलेलं रणशिंग योग्यच आहे. मराठा आरक्षणाला सरकार टोलवाटोलवी करतेय. ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.