(लांजा)
आपले धार्मिक सण, उत्सव साजरे करत असताना कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या व सण उत्साहात आणि आनंदात साजरे करा. संपूर्ण जिल्ह्यात १८ ठिकाणी पोलिस चौक्या महामार्गावर उभ्या करण्यात येणार असून, अपघातस्थळांची पाहणी करून त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा लवकर उपलब्ध कशी होईल, यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
सोमवारी सकाळी ११ वा. लांजा येथील संकल्प सिद्धी हॉलमध्ये लांजा पोलिसांच्यावतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व समन्वय समितीची आढावा बैठक झाली. यामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड जनतेशी संवाद साधताना बोलत होत्या. गायकवाड म्हणाल्या, ‘यावर्षी गणपती उत्सव आणि ईद हे सण एकाचवेळी येत आहेत. अशाच वेळी आपण आपापले सण साजरे करत असताना इतर धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे. जर समाजामध्ये कोणी असे कृत्य करत असेल त्याला समाजबांधवांनी समज दिली पाहिजे. वेळ पडल्यास पोलिसांची मदत घ्यावी. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम यामध्ये जर कोणी आक्षपार्ह पोस्ट टाकत असेल तर त्याला आपण समज द्यावी व तातडीने याबाबतची कल्पना पोलिसांना द्यावी. त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल केला जाईल.