(मुंबई)
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार एक आनंदाची बातमी घेऊन आलेय. नोकरी करताना उच्च पदव्या मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन रकमेत ५ पट वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पीएचडी सारखी उच्च पदवी संपादन केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन रक्कम १०,००० रुपयांवरून ३०,००० रुपये करण्यात आली आहे. प्रोत्साहन रक्कम वाढवण्यासाठी २० वर्ष जुन्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे.
यापूर्वी उच्च पदवी मिळवणाऱ्या कर्मचार्यांना २,००० ते १०,००० रुपये एकरकमी प्रोत्साहन दिले जायचे. परंतु, २०१९ पासून ही प्रोत्साहन रक्कम २,००० रुपयांवरून १०,००० रुपये करण्यात आली. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, ३ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा पदवी डिप्लोमा प्राप्त करण्यासाठी १०,००० रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातील. त्याच वेळी, तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची पदवी किंवा डिप्लोमा मिळवण्यासाठी १५,००० रुपये दिले जातील.