(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या जिल्ह्यातील एका पर्यटकाच्या गाडीची काच फोडून गाडीतील 34 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना रविवार 28 ऑगस्ट रोजी घडली होती. याबाबतची फिर्याद निखिल दिलीप कुवेसकर (31, मूळ मिठगवाणे, राजापूर, सध्या गाडीतळ, रत्नागिरी) यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. सागर अनंत गोणबरे (30, रानपाट, गोणबरेवाडी, रत्नागिरी), प्रदीप शशिकांत कळंबटे (33, देवरुख, संगमेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील कुवेसकर हे रानपाट (उक्षी) गावी 28 ऑगस्ट रोजी उक्षी धबधब्यावर दुपारच्या सुमारास फिरण्यासाठी गेले होते. यावेळी उभ्या करुन ठेवलेल्या कारची काच फोडून साईड बॅग, 25 हजार रोख रक्कम आणि इतर असा एकूण 34 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
याबाबतची फिर्याद कुवेसकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी सागर गोणबरे व प्रदीप कळंबटे यांना अटक करून न्यायालयापुढे हजर केल़े. न्यायालयाने त्यांची 7 हजार रुपयांच्या जामीनावर सुटका केल़ी. संशयितांच्यावतीने अॅड. सचिन पारकर यांनी काम पाहिल़े.