(रत्नागिरी)
‘ईव्हीएम’च्या माध्यमातून भारतीय नागरिकांना संविधानाने बहाल केलेला मताचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. ईव्हीएममुळे मतदारांना आपण ज्या उमेदवाराला मत दिले आहे ते त्यालाच गेले आहे का नाही, हे समजत नाही. त्यामुळे ईव्हीएम मशीनला विरोध करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चातर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमपासून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘ईव्हीएम हटवा.. देश वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
सर्वोच्च न्यायालयाने दि. ८ ऑक्टोबर २०१३ मध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून पारदर्शी निवडणुका घेणे शक्य नाही, असा निकाल दिला आहे. तरीही निवडणूक आयोग ईव्हीएम मशीनवरच निवडणुका घेत आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाही उद्ध्वस्त करून आधुनिक मनुस्मृती लागू करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप भारत मुक्ती मोर्चातर्फे करण्यात आला आहे.
ईव्हीएम मशीन विरोधात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये भारतभर जागृती केली जात आहे. त्यासाठी मंगळवारी रत्नागिरीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात युयुत्सू आर्ते, बी. के. पालकर, अजय तांबे, समिधा पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
लोकशाही, संविधान जिवंत ठेवण्यासाठी ईव्हीएम चा वापर टाळला पाहिजे – युयुत्सु आर्ते
या मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले. यावेळी आर्ते म्हणाले की, ईव्हीएम हे सर्वात घातक मशीन आहे. गेल्या चार लोकसभांमध्ये याचा वापर करण्यात आला व त्याचा दुष्परिणाम आज दिसून येत आहे. प्रगत तंत्रज्ञान असलेल्या देशात देखील ईव्हीएम बंद करण्यात आले आहे. मात्र भारतासारख्या देशात ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीला धोका येईल असे निकाल लागलेले आहेत. यंदाच्या 2024 च्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर न करता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी यावेळी आर्ते यांनी भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने केली आहे. लोकशाही, संविधान जिवंत ठेवण्यासाठी ईव्हीएमचा वापर टाळावा. तसेच ईव्हीएम बंद करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते भविष्यात करण्यात येऊन ईव्हीएमला विरोध करण्यात येईल असे यावेळी आर्ते यांनी स्पष्ट केले.