नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालयाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी केली. याविरोधात काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना विजय चौक येथे ताब्यात घेतले. यावेळी राहुल गांधी यांनी थेट रस्त्यावर ठाण मांडले. यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या तुलना एक फोटो शेअर केला असून, याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
‘ईडी’ चौकशीचा निषेध करत केंद्र सरकारकडूक केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. त्यांनी राष्ट्रपती भवनावर मोर्चे काढण्याची तयारही केली. याचवेळी विजय चौकमध्ये त्यांना अडकविण्यात आले. येथे राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला शांततापूर्ण आंदोलन करण्यापासून रोखले जात आहे. येथे पोलीसराज आहे. हेच भारताचे आजचे वास्तव आहे. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी व अन्य खासदारांना पोलिस बसमधून आंदोलन स्थळापासून हलवले.
काँग्रेस पक्षाचे ट्विट चर्चेत
राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने एक ट्विट करण्यात आले. यामध्ये एक फोटो आणि कवितेचा उल्लेख आहे. इंदिरा गांधी यांच्या सारखेच राहुल गांधी यांनी आंदोलन केले असून यापुढे राहुल गांधी हेही इंदिरा गांधी यांच्या सारखेच आक्रमक रुप धारण करतील, असे संकेत दिले आहेत.