(मुंबई)
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीकडून पूर्व उपनगरातील तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत, या धाडी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या धाडसत्रामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
श्रद्धा डेव्हलपर्सच्या कार्यालयावर धाडी
पत्राचाळ प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या मनी लॉर्डिंग गुन्ह्यात अटक केलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सध्या न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड तुरुंगात आहेत. दरम्यान बुधवारी सकाळी ईडीकडून संजय राऊत यांचे आमदार बंधू सुनील राऊत यांचा मतदार संघ असलेल्या विक्रोळी आणि भांडुप, मुलुंड येथे असणाऱ्या येथील श्रद्धा डेव्हलपर्सच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. श्रद्धा डेव्हलपर्सचे या परिसरात मोठे बांधकाम प्रोजेक्ट सुरू असून ईडीच्या अधिकाऱ्याकडून यासंबंधी काही फाईली तपासण्यात आलेल्या आहेत. संजय राऊत यांच्या अटकेनंतर पूर्व उपनगरातील काही बडे बांधकाम व्यवसायिक ईडीच्या रडारवर आले असून ईडीच्या या कारवाईमुळे राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे