(लांजा)
रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान, या स्पर्धेतर्गत निवड झालेल्या तालुक्यातील शिरवली, वनगुळे, जावडे व लांजा नं. ५ शाळेतील पाच विद्यार्थी अमेरिकेतील नासा तसेच इस्रो या संस्थांना भेट देण्यासाठी लांजातून रवाना झाले. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांमधून संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण होण्याच्यादृष्टीने प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत यावर्षी प्रथमच नासा आणि इस्रोभेटीसाठी जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान, ही निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेत तालुक्यातून नासा व इस्रोभेटीसाठी जावडे नं. १ चा प्रणव कोलगे व पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शिरवलीचा सुमेध जाधव यांची, तर इस्रो भेटीसाठी पूर्ण प्राथमिक वनगुळे शाळेची गायत्री पराडकर, शिरवली शाळेची स्वाती गोबरे आणि पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं. ५ चा राजवर्धन गंगणे यांची निवड झाली आहे. लांजा शाळा क्र. पाच येथे या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.